पालघर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना पालघर जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र रुग्णालयातून दुचाकीवरुन घरी जाताना त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे कोणतंही वाहन न मिळाल्याने त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला. पालघरमधील चिंचारे इथे ही घटना घडली.


मूळचे चिंचारे येथील असलेल्या लडका वावरे यांना काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार पूर्ण झाल्याचं सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना काल (27 मार्च) डिस्चार्ज दिला. मात्र घरी जात असताना अर्ध्या रस्त्यात दुचाकीवरच अचानक त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊमुळे वाहतूक ठप्प असल्यामुळे त्यांना कोणतंही वाहन मिळालं नाही. तसंच अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यानेमुळे दोन्ही मुलांनी दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला.


कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने लडका वावरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आधी राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. शिवाय अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांव्यरिक्त इतर वाहनं बंद करण्यात आली आहेत. परंतु या लॉकडाऊनमुळे दुचाकीवरुन मृतदेह नेण्याची दुर्दैवी वेळही आली.