सांगली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठी मोठा आटापीटा करावा लागत आहे. एकीकडे माणसांची ही अवस्था तर प्राण्यांचीही स्थिती काही वेगळी नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खाद्य मिळत नसल्याने भुकेपोटी कोंबड्या कोंबड्यांच्या जीवावर उठल्या आहेत.
पोल्ट्री धारकांना खाद्य पुरवठा करणे अडचणीचे ठरल्याने कोंबड्या आता कोंबड्यांना मारून खाऊ लागल्या आहेत. तासगाव तालुक्यात हे धक्कादायक चित्र सध्या पोल्ट्रीमध्ये पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाच्या संकटामुळे सर्वकाही ठप्प आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाला त्याचा फटका सुरुवातीपासून बसला आहे.
सुरुवातीला कोंबड्यांमुळे कोरोना होत असल्याची मोठी अफवा पसरल्याने ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक पोल्ट्री धारकांनी आपल्या हजारो कोंबड्या जिवंत पुरल्या, तर कुणी ठार मारल्या, तर कुणी फुकट वाटल्या. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय हा अडचणीत सापडला. अशा परिस्थितीत अनेक पोल्ट्री धारकांनी आपला व्यवसाय जतन करण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पुन्हा संकटात सापडला.
संपूर्ण कोंबडी उठाव बंद झाला. दुसर्या बाजूला ज्या कोंबडी आहेत, त्यांना खाद्य देणे हे पोल्ट्री धारकांना आर्थिकदृष्ट्या अडचणीचे बनले. आणि यातून तासगाव तालुक्यातील पोल्ट्री शेडमध्ये विदारक चित्र निर्माण झाला आहे. खाद्य मिळत नसल्याने कोंबड्याच कोंबड्यांच्या जीवावर उठल्या आहेत. जिवंत कोंबड्यांना मारून खाण्याचा प्रकार कोंबड्यांकडून सुरू आहे. केवळ खाद्य मिळत नसल्याने कोंबड्यांना हिंस्त्र आणि मांसहार बनण्याची वेळ आली आहे. तर आर्थिक दृष्ट्या खाद्य घालणे परवडत नसल्याने पोल्ट्री धारकांसमोर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी पोल्ट्री धारकांमधून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या