मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचं काम झालं. रोजचा संघर्ष कमी होता की काय त्यात कोरोनाची भर पडली. भविष्यात काय होणार या चिंतेने अनेकांना रात्रभर झोप येत नाही. परंतु या सर्वांना तोंड देणाऱ्या मुंबईतल्या निराधार पण लढवय्या वृद्ध पांचोली दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी काल (5 एप्रिल) एबीपी माझाने दाखवली. या आजी-आजोबांची व्यथा समोर आणल्यानंतर आज मदतीचे अनेक हात आज पुढे आले आहेत. कोण धान्य देतंय, कोण आर्थिक मदत करतंय तर कोण आरोग्यची जबाबदारी उचलतं आहे. अनेक आमदार, कलाकार, सामाजिक संस्थासह सामन्य नागरिकही या आजी आजोबांना मदत करत आहे.


कोणाकडून मदतीचा हात?

- जागरुक नागरिक मंचाकडून निरंजन अहिर यांनी या दाम्पत्याच्या घराची दुरुस्ती करणार असल्याचं सांगितलं.

- लालबाग राजा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांच्याकडून या आजी-आजोबांच्या संपूर्ण आरोग्याची जबाबदारी उचलण्यात आली आहे

- सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मंत्री उदय सामंत यांनी कायमस्वरुपी या दाम्पत्याची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे.

- शिवसेनेच्या नितीन डिचोलकर यांनी आर्थिक तसेच पुढील महिन्यांचे अन्नधान्याही या आजी आजोबांना पोहोचवले आहे.

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे

- एवढंच नाही तर कलाकार मंडळीदेखील या बातमीनंतर पुढे आली आहेत. 'मराठी तारका'तर्फे महेश टिळेकर यांनीही पुढाकार घेत मदत केलेली आहे.


निराधार पांचोली दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी!
पाय टाकताच संपणारं घर, काळवंडलेल्या भिंती, मोडकळीस आलेला संसार आणि स्वत:सोबत कोरोनाशी सुरु असलेला संघर्ष ही कहाणी आहे मुंबईतल्या 80 वर्षांच्या लढवय्या आजी आजोबांची. अंधेरी पूर्वतल्या पीएमजीपी परिसरात हे पांचोली दाम्पत्य राहतं. या वयात निराधार असलेलं हे दाम्पत्य एकमेकांना आधार ते कसेबसे दिवस ढकलत आहे. एकाने कमवायचं आणि एकानं घर सावरायचं हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम पण सध्या कोरोनामुळे यांच्यावर भलमोठं संकंट ओढवलंय. याही वयात आजोबा शिलाई मशिनवर पाय ठेवतात ते फक्त दोन वेळचं पोट भरण्यासाठी. शिलाई मशीनवर पाणी गाळायच्या पिशव्या तयार करुन रेल्वेत विकायच्या जे पैसै मिळतील त्यात घर चालवायचं. पण आता लॉकडाऊनमुळे ना ट्रेन चालतेय ना यांची पिशवी विकली जातेय. म्हणून काही हे आजी आजोबा हरले नाहीत. घरात रडत बसत नाहीत. तर ते लढतायत नशिबी आलेल्या द्रारिद्याशी...कोरोनाशी.



मुलांचं निधन आणि संघर्षाला सुरुवात
या वयात आपल्या आई-बापाला भोगावं लागणारं दुःख कोणाच्याही मुलांना बघवणार नाही. पण हे दुःख पाहायलाही या आजी आजोबांची मुलं जिवंत नाहीत. अनेक वर्षांपूर्वी यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं आणि त्यांचा संघर्ष सुरु झाला. पूर्वी मुंबईच्या एका कपड्याच्या दुकानात आजोबा टेलरिंग करायचं, पण आता स्वत: शिलाई मशीनवर बसून काम करत आहेत याही वयात त्यांना भविष्याची चिंता लागली आहे. कोरोनाचं संकंट दूर कधी होणार याची वाट बघत आहेत. कोरोनाच्या संकटात आपण सगळेच अडकलो आहोत. पण किमान तुमची आमची काळजी घ्यायला कोणीतरी आहे. पण याचं काय? दोन वेळ खायचे वांदे तिकडे सॅनिटाझर तर सोडा पण मास्क विकत घ्यायचीही यांची परिस्थिती नाही. मात्र स्वत:च शिलाई मशीनवर बसून मास्क तयार करुन ते वापरत आहेत.



एबीपी माझाकडून छोटासा मदतीचा हात
खरंतर या आजी आजोबांची बिकट परिस्थिती पाहून माणूसकीच्या नात्याने एबीपी माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांनी या निराधार कुटुंबाला छोटासा मदतीचा हात दिला. मदत मिळ्याल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला. खरंतर यांना आर्थिक मदतीसोबत गरज आहे ती मानसिक आधाराची, त्यांच्यासोबत खंबीर उभं राहण्याची त्यांचा हातात हात घेऊन त्यांच्यासोबत लढण्याची.

India Lockdown | आयुष्याच्या संध्याकाळी... कोरोनाशी कसोटी! मुंबईतल्या पांचोली दाम्पत्याची कहाणी