मुंबई : एकीकडे कोरोनाचं संकट सुरु असताना भाजपने प्रचार मोहीम सुरु केली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपच्या स्थापनादिनाचं औचित्य साधत भाजपप्रणित नवं भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मुंबईतील रिक्षाचालकांना मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजर वाटण्यात आलं. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि रिक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफात शेख यांच्या हस्ते या वस्तूंचा वाटप करण्यात आलं. या मास्कवर आशिष शेलार आणि हाजी अराफात शेख यांची नावं देखील आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, ग्लोव्ज घालणे आणि सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे. मुखतः जे इतर नागरिकांच्या जास्त संपर्कात येत आहेत, त्यांनी याचं पालन करणं आवश्यक आहे. मुंबईमधील रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांच्या संपर्कात येत असतात. त्यांना आज भाजपप्रणित नवं भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजर वाटण्यात आलं.
भाजपचा आज (6 एप्रिल) 40 वा स्थापना दिवस आहे. याच निमित्ताने मुंबईतील गरीब रिक्षाचालकांना भाजपचे आमदार आणि हाजी अराफात शेख यांच्या हस्ते मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजर वाटप करण्यात आलं. या वस्तूंचं वाटप करणं ही चांगली गोष्ट असली तरी भाजपने यातून प्रचार केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे सरकार, अत्यावश्यक यंत्रणा सर्वोतोपरी मदत करत असताना, भाजपने मात्र या परिस्थितीतही मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजरच्या माध्यमातून प्रचाराची संधी सोडलेली नाही.
याआधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. या मदतीची पाकिटांवर भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांचा फोटो छापण्यात आला होता.
कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. गरीबांना मास्क किंवा ग्लोव्ज यासारख्या वस्तूही विकत घेता येत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांना या वस्तूंचं वाटप करुन हा सामाजिक कार्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी दिली. तसंच रिक्षाचालकांना केंद्राच्या जीआरप्रमाणे राज्याने देखील पाच किलो धान्य द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली.
Coronavirus | कोरोनाच्या संकटातही भाजपची प्रचार मोहीम, मास्कवर शेलार यांचं नाव
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
06 Apr 2020 03:57 PM (IST)
एकीकडे सरकार, अत्यावश्यक यंत्रणा कोरोनाच्या संकटात अहोरात्र प्रयत्न करत असताना, भाजपने मात्र या परिस्थितीतही मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजरच्या माध्यमातून प्रचाराची संधी सोडलेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -