CORONAVIRUS UPDATES | नाम फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या उपाययोजनांसाठी एक कोटींची मदत

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Mar 2020 10:25 PM
जालना- विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याच्या 50 गाड्या पोलिसांकडून जप्त, तर इतर 58 जणांकडून 16 हजारांचा दंड वसूल, जालना पोलिसांची कारवाई

नाम फाऊंडेशनच्या वतीने कोरोना पीडितांसाठी उपाययोजना करण्यास पंतप्रधान सहाय्यता आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 50 लाख, नाम फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांची माहिती
साखर कारखान्यातून हँड सॅनिटायझर बनायला सुरुवात, राज्यातील एकूण 37 प्रकल्पांना मंजुरी, 100 मिलीच्या रोज 20 लाख बॉटल्स होतायत तयार, लवकरच रोज 4 लाख 76 हजार लिटर सॅनिटायझर तयार होणार
कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक, 13 शासकीय आणि 8 खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज 5500 चाचण्या होऊ शकतात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
अहमदनगर : कोरोनाबधित रुग्णांमध्ये आणखी एक रुग्णांची वाढ, एकाच दिवसात वाढले 3 रुग्ण, आता जिल्ह्यात एकूण 8 कोरोनाबधित रुग्णांची नोंद
वसई-विरार पाठोपाठ आता नालासोपाऱ्यात ही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण 55 वर्षाचा असून तो सध्या मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. हा रुग्ण नालासोपाऱ्याच्या निळेमोरे गावात राहात आहे. त्यामुळे वसई तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता सातवर गेली आहे. नव्याने सापडलेला रुग्ण हा मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात काम करत होता. कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात उपचार घेत होते त्या परिसरात त्याचा वावर असायचा. त्याच्या घरात एकूण तीन जण होते. त्यांना ही खबरदारीसाठी जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल आहे. या बाबतची माहिती स्वतःच या रुग्णाने महापालिकेला कळविल्याच महापौर प्रविण शेट्टी यांनी सागितले आहे. तर या रुग्णाच्या घराच्या आसपास महापालिकेच आरोग्य पथक जावून पाहणी करणार आहे. तर लवकरत या परिसरात देखील औषध फवारणी करणार असल्याचही महापौरांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते. 8 जानेवारीच्या आदेशात अंशतः बदल करुन आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.
लॉकडाऊनचे नियम धुडकावणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी गांधीगिरीने अद्दल घडवली. सायकल घेऊन सकाळी बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यात अडवून पोलिसांनी त्यांची ओळख परेड केली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.
कोल्हापुरातील समाज कल्याण विभागातील प्रताप कांबळे यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 50 हजारांची मदत दिली आहे. प्रताप कांबळे यांनी कोल्हापूरचे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हा धनादेश सुपूर्द केला. तसंच सरकारी अधिकाऱ्यांनी देखील मदतीसाठी सरसावण्याचं आवाहन कांबळे यांनी केलं आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या जर्मनी आणि युरोपियन युनियनमधील 317 प्रवाशांना घेऊन चार्टर विमान पहाटे दाबोळीहून फ्रँकफर्टला रवाना झाले आहे, गोव्यात जवळपास 1600 विदेशी पर्यटक असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही देशांमधील पर्यटक चार्टर विमानाने आपल्या देशात परतणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
कुडाळमधील माणगावमध्ये बाजार भरला, नागरिकांची तुफान गर्दी, पोलिसांच्या प्रसादानंतर गर्दी पांगली

तळकोकणात लॉकडाऊनची ऐशीतैशी झाल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधल्या माणगावमध्ये आज बाजार भरवण्यात आला. त्यामुळे इथे मोठी गर्दी उसळली होती. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: बट्ट्याबेळ झाला आहे. माणगाव पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत बाजार बंद केला. तसंच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं. तर दुसरीकडे फोंडाघाट, सावंतवाडी ही ठिकाणं पूर्णपण लॉकडाऊन आहेत. गर्दी टाळण्यासाठी आजपासून अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता, सर्व दिवस आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सावंतवाडीमधील बाजारपेठही पुढील तीन दिवस बंद आहे.
बीड जिल्ह्यामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जाईल, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र आजही अनेक पेट्रोल पंपावर लोक अगदी रांगेत उभे राहून पेट्रोल भरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. माजलगाव शहरातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली आहे. यासोबतच दिंद्रूडमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. देशात लॉकडाऊन असल्यामुळे कुठल्याही व्यक्तीने अनावश्यक घराच्या बाहेर फिरायचे नाही म्हणूनच बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्वसामान्य व्यक्तींना पेट्रोल बंदीचा निर्णय बीड जिल्ह्यासाठी घेतला होता. मात्र लोकांनी या निर्णयाला हरताळ फासण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा करु नये. देशात लॉकडाऊन असताना विनाकारण चेष्टेचा विषय केला जाता कामा नये, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. एप्रिल फूलच्या नावाखाली कोणी चेष्टा केली आणि त्यासंबंधी कोणी पोलिसांकडे तक्रार केली तर योग्य ती दखल घेतली जाईल. पण लोकांनी हा चेष्टेचा विषय करु नये, परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं. सोशल मीडियावर अफवा परवल्या तर सायबर पोलीस योग्य कारवाई करतील, असंही गृहमंत्री म्हणाले.
एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा करु नका : गृहमंत्री

इस्लामपूरात मध्ये एकत्रच कोरोनाचे 25 रुग्ण आढळले आणि अवघ्या महाराष्ट्रात हाहाकार माजला. मात्र सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे न डगमगता परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर जयंत पाटील यांनी जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली. तसेच परिसराचा आढावा घेतला. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये, हाच आमचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. या भेटीदरम्यान जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून जावू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि घरातच रहावे असे आवाहन जनतेला केले.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना वॉर्डात एका संशयित रुग्णाचा सोमवारी (30 मार्च) रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. काल दुपारीच या इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात प्रथमच 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे. तसेच अति महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्याचे आदेश आहे. यासाठीच जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावर तुरळक वाहन दिसतात. याचा फायदा काही समाजकंटक घेताना पहायला मिळत आहेत. हे समाजकंटक घरात न बसता मोटरसायलवर भरधाव वेगाने फिरताना पाहायला मिळतात. शिवाजीनगर, गोवंडी येथे राहणारे सरफराज शाहिद अली शेख वय 20 वर्षे आणि मोहम्मद फैजल शेख वय 22 वर्षे हे चेंबूर संताक्रूज लिंक रोडवर 110 च्या वेगाने मोटरसायकल पळवत होते याचा व्हीडिओ काढून त्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला. मुंबई पोलिसांना हा व्हीडिओ पाहताच या तरुणाचा शोध घेतला. देवनार पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
नवी मुंबईत दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 वर पोहोचला आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये विदेशातून आलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेने मागील काही दिवसांपूर्वी परदेशात दौरा करून भारतात आलेल्या नागरिकांची एक यादी तयार केली आहे. यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी आणि टुरिस्ट कंपन्यांची मदत घेतली आहे. ही संख्या 10 हजाराच्या आसपास आहे. अशा नागरिकांच्या घरी महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः जाऊन त्यांच्या घरावर होम होम क्वॉरन्टाईनचे बोर्ड चिकटवत आहेत. शिवाय त्या घराच्या आसपास राहणाऱ्या कुटुंबियांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जात आहेत. जेणेकरून हे कुटुंबिय घराबाहेर पडू नये. त्यामुळे परदेश दौरा करून आलेल्याना सध्या अशाप्रकारे घरातच थांबविण्यात येत आहे. अशा कुटुंबियांच्या शेजारी राहणारे या नागरिकांना मदत करताना दिसत आहेत. फळ, भाज्या, दूध, किराणा सामान आणून यांच्या दरवाज्यासमोर ठेवण्यात येत आहे.
कोल्हापुरातील सीपीआरच्या कोरोना विभागातल्या सिस्टर आणि ब्रदर्सना मास्क तसंच किट देखील मिळत नाही. याबाबत सीपीआर प्रशासनाकडे मागणी करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सिस्टर्स आणि ब्रदर्स यांनी केला आहे. 'डॉक्टर येऊन स्वॅब घेऊन जातात, आम्ही त्या पेशंटसोबत 9 तास कसे थांबायचे?' असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसंच तातडीने मास्क आणि किट मिळण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अहमदनगरमध्ये कोरोना संसर्गाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांना धक्काबुक्की
कोरोना संसर्गाचा सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार
अहमदनगरमधील मुकुंदनगर परिसरातील घडला आहे. परदेशातून आलेले दोन कोरोनाबाधित रुग्ण मुकुंदनगरमध्ये राहत होते. त्या ठिकाणचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांना तीन जणांनी धक्काबुक्की करत पुन्हा यायचे नाहीत अशी धमकी दिली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात टेस्टिंग लॅब असावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. नाशिक जळगाव, अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. मात्र त्याचे नमुने हे पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जातात. यात बराच वेळ जात आहे. हा विलंब टाळण्यासाठी नाशिकमध्ये टेस्टिंग लॅब सुरु करावी, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.
इंदिरा गांधी शासकीय (मेयो) रुग्णालयात काल (30 मार्च) झालेला एका रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नसल्याचं समोर आलं आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. संबंधित व्यक्ती हा न्यूमोनियाचा रुग्ण होता. त्याच्यावर गेले अनेक दिवस खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला काल दुपारीच मेयो या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला की काय असा संशय निर्माण झाला होता. नियमाप्रमाणे त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि ती निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यभरात पाच नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यात मुंबईतील एक, पुण्यातील दोन आणि बुलडाण्यातील दोन जणांचा समावेश आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने नवं पाऊल उचललं आहे. स्विगी, झोमॅटो, अमेझॉन इत्यादीकडून होम डिलिव्हरी करण्याची चाचपणी सुरु आहे. सध्या अत्यावश्यक सेवांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अत्यावश्यक सेवांसाठी होणारी गर्दी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. स्थानिक किराणा दुकान, रिलायन्स, डी मार्ट बिग बास्केट यांच्यासोबत लाईन अप करणार आहे. किराणा माल, फळं आणि भाज्या, औषधं आणि डेअरी अशा चार भागांत विभागणी होणार आहे. सर्व काही सुरळीत होत असेल तर हा प्रकल्प अंमलात आणणार आहे.


बुलडाण्यात कोरोना ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील आलेल्या 50 जणांना रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने तर्फे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यामधील 32 जणांचे रिपोर्ट नागपूरला तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यापैकी 9 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.
सांगली : सकाळपासून किराणामाल आणि भाजीपाला खरेदीसाठी जातोय असे सांगून दुचाकीवर बाहेर पडणाऱ्यांच्या गाडया जप्त करण्यास पोलिसांकडून सुरुवात, भाजी, औषधे यांचे कारण सांगत विनाकारण शहरातून फिरणाऱ्यांना सांगली पोलिसांचा दणका
संपूर्ण जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील आकड्यांबाबत बोलायचे झाले तर, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या साडे सात लाखांच्या पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत 34 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 137 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 1318 वर पोहोचली आहे. तर यापैकी 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 137 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, काल दिवसभरात दोघांचा मृत्यू


राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये 8 रुग्ण मुंबईचे असून 5 रुग्ण पुण्याचे, 2 नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 39 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे, तर आज 2 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे सध्या राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज राज्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका 78 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर कोरोना बाधित असलेल्या 52 वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे.


राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती




    • मुंबई - 92





    • पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) - 43





    • सांगली - 25





    • मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा - 23





    • नागपूर - 16





    • यवतमाळ - 4





    • अहमदनगर - 5





    • सातारा, कोल्हापूर - 2





    • औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक - प्रत्येकी 1





    • इतर राज्य - गुजरात - 1



राज्यात आज एकूण 328 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 4538 जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3876 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 220 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 हजार 161 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1224 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आतापर्यंत 39 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी पुढीलप्रमाणे :


मुंबई- 14
पुणे- 7
पिंपरी चिंचवड- 9
यवतमाळ- 3
अहमदनगर- 1
नागपूर- 4
औरंगाबाद- 1

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.