Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही. अलीकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पुणे (Pune) येथे आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या (Vishwa Marathi Sammelan) उद्घाटनाच्या कार्यक्रमातून ते बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदय जी मी तुमचे आभार मानतो की, तुम्ही संमेलनाला मुंबईतून पुण्यात आणले. माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिले संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी जी यांचे आभार मानतो. मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार आपण करतो आहोत, सृजनशील व्यक्तिमत्व आज नाबाद 93 आहेत ते मराठीला समृद्ध करणारे आहेत. मराठीचा विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराशिवाय ते पूर्ण नाही. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही केलं ही देखील आनंदाची गोष्ट आहे, मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे त्यांनी म्हटले.


वादाशिवाय मराठी संमेलन होऊच शकत नाही 


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उदय सामंत मगाशी सांगत होते की, काही लोकांनी वाद निर्माण केला. तुम्हाला मी सांगू शकतो की साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत. इमोशनल लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्या पुस्तकात सांगितलेले आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे. कोणी नाव ठेवते, कोणी चांगले म्हणते, त्यातूनच चांगले करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते, असे त्यांनी यावेळी उदय सामंत यांना म्हटले. 


देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला दावोसचा किस्सा


जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, जिथे माझा मराठी माणूस पोहोचलेला नाही. आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसे आमच्या स्वागताला तिथे असतात. दावोसला गेल्यानंतरही पाचशे आठशे किलोमीटरवरून मराठी माणसे माझ्या स्वागतासाठी आली होती. एका चिमुरड्याने लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे इतकं सुंदर म्हणून दाखवलं. मला हे ऐकून इतका अभिमान वाटला की आपला मराठी माणूस तिकडे गेला तरी मराठी त्याच्यापासून दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


मी पुन्हा येईल हे वाक्य माझा पिच्छा सोडत नाही


तसेच चिमुरड्याने मी पुन्हा येईन, असे देखील मला म्हटले. मी पुन्हा येईन माझा पिच्छा सोडत नाही. कुठेही गेलं की मी पुन्हा येईन असेच असते. अलीकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो. पण, काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात. पण, तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशी फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 


मराठी माणूस दुधात साखरेसारखं काम करतो


मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठे ही असला तरी तिथे गुणवत्ता आणतो. दुधात साखरेसारखं काम करतो. आज आपल्याला ए आय बोलबाला पाहायला मिळतोय. तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी वापर केला पाहिजे. आपण एआयच्या युगात आहोत जर आपण या ठिकाणी स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे हे समजेल. मराठी भाषा विभागाला यासाठी विनंती आहे की, एआय वापर करा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


आणखी वाचा 


Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!