LIVE UPDATES | राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी

Coronavirus Live Updates : राज्यात गुरुवारी 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काल झालेल्या 152 मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 1 एप्रिल ते 8 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 117 मृत्यूपैकी मुंबई 87, मीरा भाईंदर 8, कल्याण डोंबिवली 7, सोलापूर 7, नवी मुंबई 4, नाशिक 3 आणि वसई विरार 1, अशी संख्या आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2020 09:02 PM
राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी, शाळा कशा सुरू करता येतील यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा
पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना फोन. कोरोनाची लागण झाल्याचे कळताच सर्व मतभेद दूर सारुन भावाची विचारपूस. सोबतच घरी आई, पत्नी आणि मुलाबाळांच्या तब्येतीचीही घेतली माहिती. 'लवकर बरा होऊन ये' म्हणत दिल्या शुभेच्छा.
राज्यात आज 1718 रुग्ण कोरोनामुक्त, आजपर्यंत एकूण 47,796 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आज 3493 नवीन रुग्णांची नोंद, आज 127 रुग्णांचा मृत्यू
सोलापुरात फेसबुकवर विरोधात कमेंट केल्याने दोघांना जबर मारहाण. भाजपच्या नगरसेविका आणि 5 साथीदारांसह चार अज्ञात विरोधात गुन्हा दाखल. नगरसेविका आश्विनी चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामाविषयी फेसबुक पोस्ट होती.
विरारमध्ये 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या कुटुंबियांवर केला चाॅपरने प्राणघातक हल्ला, लॉकडाऊनच्या काळात होत असलेल्या आर्थिक विवंचनेतुन हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
मंत्री धनंजय मुंडे यांचा बीडचा खासगी स्वीय सहायकाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह. यापूर्वीच धनंजय मुंडे यांचे दोन सहाय्यक, दोन ड्रायव्हर आणि एक कूक पॉझिटिव्ह आला आहे. आमदार संजय दौंड यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी तर दीड तासांच्या मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर

पिंपरी चिंचवड : स्नेहवर्धक मंडळ ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. तहसीलदारांनी छापा टाकून महाविद्यालयाचे हे बिंग फोडले. तसेच याप्रकरणी संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा-महाविद्यालय बंद असताना आणि परीक्षांबाबत कोणताच निर्णय झाला नसताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यात आलं. वाणिज्य विभागाच्या या विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅप मेसेज करून परीक्षेला येण्यास भाग पाडले. काल एक पेपर झाला तेंव्हा प्रशासनाच्या कानावर ही बाब पडली आणि आज थेट पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तळकोकणात रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले असून जिल्ह्यातसकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. पहाटे पासुन जिल्हाच्या सर्वच भागात सततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात दमदार पाऊस पडत आहे. मागील 24 तासात 78 मी मी सरासरी पाऊस जिल्ह्यात पडला आहे. तर देवगड तालुक्यातील 140 मी मी पाऊस झाला तर मालवण मध्ये 158 मी मी पाऊस झाल्याने रस्त्यावरुन पाणी जात आहे. देवगड मधील दहिबाव भागात ओहोळ तुडुंब भरून पात्राबाहेर पावसाचं पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून भात पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे.
औरंगाबाद येथील कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन. उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय अहिकाहन मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.

पंढरपूर : कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना सोलापूर बस स्थानकातून काल दोन तर आज एक एसटी बस पंढरपूरला आल्याने खळबळ, रेड झोन मधून एसटी वाहतूक करायची नसताना बसेस सोडल्या कशा? असा सवाल
भिवंडी शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने भिवंडी शहराचा आकडा 604 वर पोहोचला असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील पद्मानगर परिसरात एकाच दिवशी पंधरा ते वीस कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये बहुतांश भाजी विक्रेता,फळ विक्रेता किंवा दुकानदार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनलॉक-1 सुरु असून अनेक ठिकाणी शिथिलता देण्यात आली, तरी भिवंडी शहरातील 17 नंबर प्रभाग पद्मानगर परिसरात मात्र 7 दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या दरम्यान अत्यावश्यक दुकान वगळता इतर सर्व दुकान आणि व्यावसाय बंद राहणार आहे. तसेच लाऊड स्पिकरच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचे आणि दुकान बंद ठेवण्याचे आव्हान देखील नगरसेवक संतोष शेट्टी समाजसेवक महेंद्र गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 94 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2524 झाली आहे. यापैकी 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 128 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 1033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तळकोकणात मान्सूने अक्षरशः झोडपून काढलं असून रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे वाहत असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तळकोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाने उघडीप दिली होती. मात्र रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील ओहोळ प्रवाहित झाले आहेत. देवगड तालुक्यातील नारिंगे गावातील ओहोळ मोठ्या प्रमाणात प्रवाहीत झालेला आहे. रात्रीपासून मान्सुन मुसळधार कोसळत असल्याने शेतीत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याच चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे
मंत्र्यांना अंधारात ठेवून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गहू खरेदीचा प्रस्ताव तयार करणारे अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील सहसचिव सतीश तुपे यांची काल उचलबांगडी करण्यात आली. तुपे यांची वित्त विभागात बदली करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. खुद्द अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या प्रस्तावाबद्दल माहिती नव्हती. भुजबळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी याबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पार्श्वभूमीवर सुपे यांची अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून तडकाफडकी बदली करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.
पालघर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात नवीन 108 रुग्णांची भर पडली आहे, तर 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालघर ग्रामीणची स्थितीही गंभीर आहे. ग्रामीणमध्ये आज नवीन 66 रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात विक्रमगड तालुक्यात 33 नवीन रुग्ण तर वाडा तालुक्यात नवीन 21 रुग्ण नोंद झाली असून ग्रामीण तालुकाही कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे.पालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 1585 वर पोचला असून त्यापैकी 52 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अकोट तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्रातील खडकपाणी येथे अस्वलाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतकांच्या मृतदेहापासून 20 मीटर अंतरावर दोन अस्वलाच्या पिल्लाचे मृतदेह आढळले. दोन्ही पिल्लावर कुऱ्हाडीने वार केलेल्या जखमा आढळून आल्या. मृतांमध्ये अशोक मोतीराम गवते (52 वय) आणि माना बंडू गवते (42 वय) दोघेही निमखेडी येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड शहराने एक हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला. आज पहिल्यांदाच एकावेळी 89 रुग्णांना कोरोनाची लागण तर दोघांचा मृत्यू.
वाशिम जिल्ह्यात आज संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम तालुक्यातील पारडी टकमोर परिसरात नाल्याला चांगलाच पुर आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.
सांगली जिल्ह्यातीलॉ कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील सलून व्यावसायिकाचा आपल्या मुलांसोबत आत्महत्येचा प्रयत्न. नवनाथ उत्तम साळूखे असे सलून व्यावसायिकाचे नाव आहे. सलून दुकान बंद असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपली. तब्बल एक तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपली, तब्बल 1 तास झाली चर्चा, बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही होते उपस्थित
जालना : विहिरीत दोन मुलांसह उडी घेऊन मातेची आत्महत्या, जाफराबाद तालुक्यातील दळेगव्हाण गावातील घटना, रुक्मिणी बनकर असे या मयत आईचे नाव असून तिने 7 वर्षाच्या प्रणिती आणि दीड वर्षाच्या शंभो बनकर या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या यादीत मुंबई आयआयटी चौथ्या स्थानावर तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकोणिसाव्या स्थानावर

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल कॉरंन्टाईन ठेवण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आदेश. पुण्या-मुंबईतून लोकं आली म्हणून रुग्ण संख्या वाढली. नागरिकांच्या मदती शिवाय जिंकणे अशक्य. कोरोनाची लक्षण दिसल्यास लोकं घरी राहतात. ऑक्सीजनही घरीच लावण्याचा प्रयत्न करताना समोर आलं आहे, असं केंद्रेकर यांनी सांगितलं.
पुणे : हाऊसिंग सोसायट्यांनी आयसीएमआरच्या गाईडलाईन्सचं पालन करणं गरजेचं आहे. आमच्याकडेही तक्रारी येत आहेत. सोसायट्यांनी जर त्यांच्या गेटवर आॅक्सिमिटर लावलं तर हा प्रश्न सुटू शकेल. घरकाम करणाऱ्या महिलांना सर्टिफिकेट वगैरे मागितलं तर त्या ते कुठून आणणार? यातून वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. हाऊसिंग सोसायट्यांसाठी मी आॅर्डर काढण्याच्या विचारत आहे. हाऊसिंग सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील, मनमानी करणाऱ्या सोसायट्यांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचा इशारा
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पालघर ग्रामीण मध्ये 13 नवे रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 1490 वर पैकी 50 जणांचा मृत्यू तर 776 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 664 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पालघर ग्रामीणमध्ये 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीणचा आकडा 244 वर पैकी 6 जणांचा मृत्यू, तर 88 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 150 जणांवर उपचार सुरू आहेत.
पुणे पोलीस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने एकत्रित केलेल्या कारवाईत बनावट नोटांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जप्त केलेल्या बनावट नोटांची एकूण किंमत 87 कोटी इतकी आहे. रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरु होते. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.

औरंगाबाद सातारा परिसरात बहिण भावांच्या दुहेरी हत्याकांडातील रहस्य उलगडले, चुलत भावाने भाऊजीच्या मदतीने केली बहीण भावाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची ऑफर, शरद पवार यांचा निरोप घेऊन जयंत पाटील पोहचले होते शेट्टी यांच्या घरी, राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा भरायच्या असून त्यासाठी हालचाली सुरू
नाशिक जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम, आजीने बिबट्याच्या तावडीतून नातीची सुटका केली, नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा गावातील घटना, रात्री 9 वाजताा 4 वर्षीय चिमुरडीवर बिबट्याची झडप, आजी गजराबाई यांनी प्रसंगावधान दाखवत नातीची सुटका केली.
परभणी जिल्ह्यात रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. परभणी गंगाखेड महामार्गावरील ब्रह्मपुरी पाटीवरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. अनेकांना मांडाखळी मार्गे गंगाखेडकडे जाण्याची वेळ आली. दुसरीकडे परभणी तालुक्यातील धार रस्त्यावरील धामोडा नाल्याला ही पूर आल्याने या परिसरातील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रात्रीतून परभणी परिसरात तब्बल 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यामधील पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त 82 मिलिमीटर पाऊस हयातनगर मंडळात झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात 41 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 41 कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील 28 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1724 झाली असून शहरातील रुग्णसंख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 512 झाला आहे. आतापर्यंत 1130 जण कोरोनामुक्त झाले असून 489 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 105 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला. नाशिक शहरात जुने नाशिक, वडाळा गाव, पेठरोड आणि सिडको परिसरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1477 वर, त्यापैकी 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 776 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, सध्या 651 रुग्णांवर उपचार सुरू

धुळे जिल्ह्यातील आणखी सात जणांना कोरोनाची बाधा, धुळे शहरातील 5, शिरपूरमधील 2 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 325 वर
देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होतोय. मुंबईचा डबलिंग रेट 24.5 दिवसांवर. तर देशाचा देशाचा डबलींग रेट 16 दिवसांवर. मुंबईतला सर्वात मोठा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीतला डबलींग रेट तर 44 दिवसांवर गेलाय. तर धारावीतील ग्रोथ रेट 1.57% आहे.
परभणीचा ख्वाजा युनूसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी १६ वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह चार पोलिसांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांना आरोपी करण्यात आले होते. कोठडीत ख्वाजाचा मृत्यू झाला, असेही त्यात नमूद आहे. तरीही गृहमंत्रालयाने पोलिसांना क्लिन चीट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला चौकशी सुरू असल्याच्या कारणावरून दीर्घकाळ निलंबित ठेवता येत नाही, असे सांगत हा निर्णय घेण्यात आला आहे. या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र आहे. त्यात शिवसेना आणि भाजपही सहभागी असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. २ डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर येथे बाँबस्फोट झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी परभणी येथून सॉफ्टवेअर इंजिनिअर ख्वाजा युनूसला अटक केली. घाटकोपर येथे पोलिस कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते.
अकोल्यात आणखी 20 नवे कोरोना रूग्ण आढळलेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 884 वर. आज दुपारी आणखी एका रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. आतापर्यंत 42 रूग्णांचा कोरोनामूळे मृत्यू. तर 577 रूग्ण आतापर्यंत झालेत रोगमुक्त. सध्या 265 रूग्णांवर उपचार सुरू.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 11 आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झालंय. हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले. दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
येत्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज, हवामान खात्याची माहिती तर त्याअगोदरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
आगामी पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून एका आठवड्याकरिता घेतले जाईल. हे अधिवेशन विधान भवन मुंबई येथे होईल. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत 22 जूनचं अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत विरोधी पक्षाला विश्वासात घेण्यात येईल. आज ठरवणार पावसाळी अधिवेशनाचे कामकाज.
भिवंडी शहरात महापालिकेच्या वतीने सर्व व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांना सम-विषम नियमाप्रमाणे सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठी निर्देश देखील देण्यात आले आहे. सोबतच कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल, असा इशाराही मनपा आयुक्तांनी व्यावसायिकांना दिला असला तरी भिवंडी शहरातील अनेक भागात सम-विषम या नियमांचा उल्लंघन होत असून रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकान उघडी असून किराणा, भाजीपाला आणि साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊन सोशलडिस्टसिंगचा फज्जा उडतोय.
कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाहेर आयडीबीआय बँकेचं एटीएम असून त्यातून 5 जूनच्या रात्री तब्बल 49 लाख रुपये चोरीला गेले होते. धक्कादायक बाब म्हणजे एटीएम मशीन पासवर्डद्वारे उघडून त्यातून हे पैसे चोरण्यात आले होते. त्यामुळे या मशीनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या रायटर सेफगार्ड कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबूली दिली. यानंतर 7 जून रोजी म्हणजे चोरी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी किरण पंडित, जयदीप पवार आणि जुगलकिशोर मिश्रा या तिघांना बेड्या ठोकल्या. या तिघांकडून पोलिसांनी 39 लाख 85 हजार रोख, तसंच गाड्या, मोबाईल असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सध्या 12 जूनपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात जबरदस्तीने कर्जाचे हफ्ते वसूल करणाऱ्या बार्शी येथील फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले आहे. लॉकडाउनच्या काळात लोकांकडे रोजचं आयुष्य जगण्यासाठी पैसे नाहीत मात्र आशातही या कंपन्या हफ्तांसाठी कर्जदारांना धमकावत होत्या. एका महिलेला धमकावत असता त्या महिलेला ह्रदयविकाराचा धक्का बसला त्याची तक्रार नातेवाइकांनी शिवसनेकडे केली. तसेच कंपन्यांचे कर्मचारी लोंकांना घरी जाऊन, शिवीगाळ करून पैसे भरण्यासाठी धमकावत असल्याने तसेच एका महिलेचे मंगळसूत्र देखील हा हफ्त्यासाठी तारण ठेवावे लागले या तक्रारी दिल्यानंतर आज शिवसेनेने आपल्या स्टाईलने आंदोलन केल्याचं बार्शीचे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कोविड रुग्णालयातील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोविड रुग्णालयातून ही 82 वर्षीय महिला 2 जूनपासून बेपत्ता होती. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना गेल्या आठवडाभरापासून महिला सापडत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी हरवल्याची नोंद शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपास सुरु असतानाच आज कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमधील बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याचं समोर आलं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दरवाजा तोडला असता संबंधित महिला मृतावस्थेत आढळून आली. मात्र या घटनेने कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेसंदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेची प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्या मध्ये जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.
नागपुरात हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव परिसरात आणखी 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये या परिसरातील 51 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालं. हे सर्व आधीच संस्थात्मक अलगीकरण कक्षात होते.
अकोल्यात आज सकाळी एकही रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 864 वर पोहोचला आहे. आज सकाळी आणखी एका रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 41 रूग्णांचा कोरोनामूळे मृत्यू झाला असून आणखी 14 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 559 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 264 रूग्णांवर उपचार सुरु आहे.
बुलडाण्याच्या सागवण येथील अपंग महिलेने प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केली. 15 दिवस आधीच पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह जमिनीत पुरला होता. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून 24 तासातच प्रकरणाचा उलगडा करत आरोपी पत्नी, प्रियकर आणि प्रियकराच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
पुण्यात रात्रभरात 53 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या 10,012 वर पोहोचली आहे. तर, आत्तापर्यंत 442 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज (10 जून) सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 865 रुग्णांवर उपचार सुरु आहे. नव्याने आढळलेल्या 114 कोरोनाबाधितांमध्ये हर्सूल जेलमधील 14 कर्मचारी आणि कैद्यांचा समावेश आहे. यापूर्वीही 29 कैद्दी कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे आता हर्सूल कारागृहातील 43 कर्मचारी आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सातारा : रात्रीत 20 रुग्णांचे रिपोट पॉझिटिव्ह आले असून जिल्हात बाधितांची संख्या 669 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंत 28 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 401 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कार्टून पाहण्यास मज्जाव केल्याने 13 वर्षीय मुलाने घेतला गळफास, पुण्यातील घटना. सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने उचललेल्या या घटनेनंतर बिबवेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
परभणी पोलीस दलासाठी 'शार्पेन अॅन अ‍ॅक्स' मोहीम; सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने रजा मिळणार
परभणीत पोलीस दलासाठी 'शार्पेन अॅन अ‍ॅक्स' मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्याने रजा मिळणार आहे. यामुळे कोरोनामुळे सतत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. पालघर ग्रामीण भागात काल एका दिवसात 69 रुग्ण वाढले. तर जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1397 वर पोहोचला असून त्यापैकी 48 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 716 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले असून सध्या 633 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पालघर ग्रामीणचा आकडा झपाट्याने वाढत असून ग्रामीणमधील कोरोनाबाधितांची संख्या 229 वर पोहोचली आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात रात्रभरात नव्या 11 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात 43 जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1683 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1093 बरे झाले असून 488 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय मृतांचा आकडा शंभरीपार गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 102 जणांचा मृत्यू झाला आहे.

पार्श्वभूमी

Coronavirus Live Updates : राज्यात गुरुवारी 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


काल झालेल्या 152 मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 1 एप्रिल ते 8 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 117 मृत्यूपैकी मुंबई 87, मीरा भाईंदर 8, कल्याण डोंबिवली 7, सोलापूर 7, नवी मुंबई 4, नाशिक 3 आणि वसई विरार 1, अशी संख्या आहे.


राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.


सध्या राज्यात 5,73,606 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वॉरंटाईन सुविधांमध्ये 75,493 खाटा उपलब्ध असून सध्या 28,066 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


राज्यातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांपेक्षा रिकव्हर झालेले रुग्ण जास्त

1.रायगड, 2.नाशिक, 3.अहमदनगर, 4.धुळे, 5.नंदूरबार, 6.पुणे, 7.सातारा, 8.कोल्हापूर, 9.सांगली, 10.रत्नागिरी, 11.औरंगाबाद, 12.जालना, 13.हिंगोली, 14.परभणी, 15.लातूर, 16.उस्मानाबाद, 17.बीड, 18.नांदेड, 19.अकोला, 20.अमरावती, 21.यवतमाळ, 22.बुलडाणा, 23.नागपूर, 24.वर्धा, 25.भंडारा, 26.गोंदिया, 27.चंद्रपूर आणि 28.गडचिरोली या जिल्ह्यांत उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. म्हणजे राज्यातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांपेक्षा रिकव्हर झालेले रुग्ण जास्त आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.