मुंबई : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळपास पाच हजार लोकांचा यात मृत्यू झालाय. तर, सव्वालाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शेअर मार्केटसह मोठमोठ्या उद्योगांना याचा फटका बसत आहे. भारतातही कोरोनाचा गंभीर परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे. कोरोनामुळे पर्यटन, पोल्ट्री, धार्मिक उत्सव, चित्रपटगृह, क्रीडा, सरकारी कार्यक्रमांवर गदा आलीय. परिणामी सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आलीय.


देशात कोरोनाचा दुसरा बळी दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झालीय. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना दहावी, बारावी वगळता सुट्टी जाहीर केलीय. कोरोनाचा परिणाम छोट्यामोठ्या उद्योगांवर होत असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आलीय.

Coronavirus | कोरोना व्हायरसचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू

त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी ओसरली
कोरोनाचे सावट देवस्थानांपर्यंत पोहचले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरमध्ये भाविक पर्यटकांची गर्दी कमी झालीय. कोरोना वाढू नये म्हणून प्रार्थना करायलाही भाविक देवाच्या दारी जात नाहीत. त्यामुळे कुंभनगरीच्या अर्थकारणाला फटका बसतोय. याचा परिणाम इथल्या हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात झालाय. तर, कोरोनामुळे अक्कलकोटमध्ये देखील भाविक संख्या घटली आहे. गर्दी न करण्याच्या प्रशासनाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Coronavirus | मुंबईत चौथा कोरोनाबाधित, अहमदनगरमध्येही एकाला लागण, राज्यात एकूण 19 रुग्ण

गणपतीपुळेत शुकशुकाट
कोरोनाबाबत आता दिवसेंदिवस अधिक चर्चा होताना दिसत आहे. राज्य सरकार देखील याबाबत काळजी घेताना दिसून येत आहे. कोरोनामुळे आता कोकणातील पर्यटनावर देखील परिणाम होताना दिसत आहे. गणपतीपुळे सारख्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमीलीची घटली आहे. शिवाय, हापूसच्या निर्यातीवर परिणाम झाल्यानं आंबा बागायतदार आणि शेतकरी देखील चिंतेत आहे.

नरसोबावाडी भाविक येईनात
कोरोना व्हायरसमुळे आता राज्यातील देवस्थानांमधील भाविकांची संख्या कमी होऊ लागलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी मधील दत्त मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी संख्या कमी झालीय. यामुळे मंदिर परिसरात काही प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळतोय. जे भाविक दर्शन घेण्यासाठी येतायत ते सांगली, कोल्हापूर भागातील आहेत. मुंबई, पुणे किंवा अन्य भागातुन येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालीय. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नरसोबावाडी देवस्थानाने देखील काळजी घेतली असून गरज पडली तर भाविकांना मास्क वाटप केले जाणार आहे.

Coronavirus | अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेवर कोरोनाचे सावट
कार्ला एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेवर देखील कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकवीरा देवस्थान ट्रस्ट प्रशासकीय मंडळाने यंदाची देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे.

पोल्ट्री व्यावसाय धोक्यात
कोरोनाच्या धास्तीने कोंबडीचे मांस खाणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाल्याने कुकुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. चिकनपासून कोरोना होतो का? याबाबतीत जनजागृती केली जातेय. मात्र, ही भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे होळीच्या हंगामात देखील कोंबडीच्या मांसाला अपेक्षित अशी मागणी मिळाली नाही. परिणामी राज्यातील कुकुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. झालेला खर्च तरी काढायचा कसा? हा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी या व्यावसायाकडे वळलेत. मात्र, आता कोरोनामुळे शेतकऱ्यांना या व्यावसायातही तोटा सहन करावा लागत आहे.

टॅक्सीचालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत

परदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याने मुंबई विमानतळाबाहेर अनेक टॅक्सीचालकांना तासनतास प्रवाशांच्या प्रतिक्षेत राहवं लागतंय. तर, अनेक पर्यटनस्थळांच्या बाहेरही खासगी वाहतूक करणाऱ्यांवर संक्रांत आली आहे. कोरोनाच्या भीतीने लोक आता बाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे ट्रव्हल्स कंपन्यांची बुकींगही रद्द करण्यात येत आहेत. परिणामी या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांवर याचा थेट परिणाम होत आहे.
Coronavirus Updates | कोरोनावरुन ग्रामीण भागात काय परिस्थिती? ग्रामस्थ कशी खबरदारी घेताहेत?