मुंबई : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा देणाऱ्या बेस्टवर आता 'चिल्लर' चं नवं संकट आलेलं आहे. कोरोना च्या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देत असताना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या चिल्लरचं करायचं काय ? असा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला आहे. यावर तोडगा म्हणून या कालावधीमध्ये सेवा बजावणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना या चिल्लर मधील रक्कम पगार रुपानं देण्यात येत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हाती चिल्लरच्या पिशव्या पाहायला मिळत आहेत.
संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केल्यामुळे भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच गोष्टींवर बंदी होती. दरम्यान, या कालावधी मध्ये इतर सार्वजनिक वाहतूक देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचार्यांसाठी बेस्टच्या बसेस सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. त्यामुळे सुरवातीला मुंबईसह उपनागरांमध्ये या बस धावत होत्या. त्यामुळे बेस्टकडे पाच आणि दहा रुपयांची नाणी आणि शंभरच्या आतील मूल्यांच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या. मात्र, या सुट्या पैशांचे करायचे काय ? असा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला होता. यावर तोडगा म्हणून बेस्ट प्रशासनाने एक युक्ती लढवली.
या चिल्लरची विल्हेवाट लावण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना ती पगारामध्ये देण्याचं ठरवलं. ही जमा झालेली चिल्लर कोरोनाच्या संसर्गकाळात प्रत्येक कर्मचार्यांना पाच हजार रुपयांची चिल्लर वेतन म्हणून देऊ केले. तर उर्वरित वेतन बॅंक खात्यावर जमा करण्यात आले. त्यामुळे 15 तारखेनंतर या कर्मचा-यांना नाण्यांच्या पिशव्या घेताना अक्षरश: नाकी नऊ आले आहे.
कोरोनाच्या कालावधीमध्ये काही बेस्ट कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी तत्परपणे हजर राहून , गेल्या तीन महिन्यांपासून आपत्कालीन परिस्थिती मध्ये सेवा बजावलेली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांनी या कालावधीमध्ये दांड्या मारलेल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून सेवा बजावलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आता पगाररुपी ही चिल्लर पडलेली आहे. तर उर्वरित पगार बँकेत जमा होणार आहे.
कोरोना काळात बेस्टकडे दहा पाच आणि एक रुपयांची नाणी तसेच दहा आणि वीस रुपयांच्या नोटा मोठया संख्येने जमा झाल्या आहेत. या सुट्या नाण्यांमुळे बेस्टच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कोरोनामुळे ही नाणी आणि नोटा बँक स्वीकारत नसल्यामुळं आगारात अक्षरश: गोण्यांमध्ये हे पैसे भरून ठेवले जात आहेत. तर हे पैसे कर्मचार्यांना पगाराच्या स्वरूपात रोखीने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तसे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे.
बेस्ट कामगार संघटनचे सरचिटणीस जगनारायण कहार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई शहरांमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सातत्याने देण्याचे काम बेस्ट कामगार करत आलेले आहे. सेवा देत असताना शेकडो बेस्ट कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात काहींचा दुर्दैवाने मृत्यू सुद्धा झालेला आहे. तरी सुद्धा आपल्या जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी आपली सेवा देत आहे. मात्र, आता बेस्ट प्रशासनाने असंख्य बेस्ट कामगारांच्या वेतनात बेकायदेशीर कपात केली आहे. त्यामुळे वेतनात कपात झालेल्या बेस्ट कामगाराला उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तरीही या परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चिल्लर रुपाने वेतन देण्यात येत आहे. सध्या बँका चिल्लर आणि या नोटा स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे कामगारांना या नोटांचे करायचे काय असा प्रश्न पडलेला आहे. बेस्ट प्रशासनानं पगार देत असताना याचा विचार करणं गरजेचं होतं.
सुनील माने म्हणाले, गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही अहोरात्र सेवा दिलेली आहे. प्रवाशांकडून मिळणारी रक्कम आम्ही डेपोत जमा ही केली. मात्र हीच चिल्लर आम्हाला पगार म्हणून मिळेल याची कल्पना नव्हती. पगार घेत असताना पाच हजार रुपयांची चिल्लरची पिशवी आमच्या हातात देण्यात आली. तर उर्वरित रक्कम ही बँकेत जमा झाली. आता या चिल्लरचं करायचं काय असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे.