पालघर : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या प्रसारामुळे अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर 31 मार्चपर्यंत दर्शन व्यवस्थाही भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार डहाणू प्रांताधिकारी सौरभ कटीयार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 3 वाजता महालक्ष्मी मंदिर कार्यलयात शासकीय यंत्रणा व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यात्रा संदर्भात तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती.


डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमा पासुन सुरू होत असून सतत 15 दिवस चालणाऱ्या यात्रेत दरवर्षी याठिकाणी जिल्ह्यातील भाविकाबरोबर मुंबई, ठाणे आणि गुजरात राज्यातील लाखो भाविक येतात. सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठया प्रमाणात विविध प्रकारची दुकाने, करमणूक खेळ, खाद्य पदार्थ, पाळणे आदी दुकाने थाटली जातात. सदर यात्रा 8 एप्रिल पासुन सुरू होणार होती. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे राज्यात शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली असून पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, सामजिक कार्यक्रम इत्यादींवर बंधी आणली असून पालघर जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदी आदेश 31 मार्च पर्यंत लागू केला आहे. त्या अनुशंगाने कोरोनाबाबत खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत भाविकांना मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले असून यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रसार आणि पुढे येणाऱ्या महालक्ष्मी यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पुढील उपाययोजना आणि खबरदारीसाठी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यात्रा दरम्यान आंतरीक पूजा मात्र होणार आहे.


पाहा व्हिडीओ : #Corona Symptoms | कोरोना व्हायरसची लक्षणं काय आहेत?



शासननिर्णय व जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेश 31 मार्च पर्यंत असले तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेता 8 एप्रिल रोजी यात्रा होणे शक्य नाही त्यामुळे ती रद्द करण्यात येत असल्याचं डहाणुचे प्रांताधिकारी सौरभ कटीयार यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाचा प्रसार लक्षात घेता प्रांताधिकारी यांनी आयोजित केलेल्या सभेत पुढील खबरदारी म्हणून चैत्र पौर्णिमाला सुरू होणारा देवीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सांगितले आहे.


संबंधित बातम्या :


देवा म्हाराजा! या कोरोनाचा नायनाट कर म्हाराजा!; कोकणी माणसाचं ग्रामदेवतेल साकडं


मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान