मुंबई : जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. रोज शेकडो लोक कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसातील जगभरातील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा व्हायरस किती भयंकर आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. जगभरात कोरोनाचे साधारण 3 लाख 37 हजार रुग्ण आढळले आहेत, यामध्ये 14 हजार 616 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसातील आकडेवारी घाबरवणारी आणि चिंता वाढवणारी आहे. नव्या आकडेवारीनुसार रोज मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


18 मार्च
जगभरातील कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 8951 एवढी होती. मृत्यूदर 9.49 टक्के होता.


19 मार्च
जगभरातील मृतांचा आकडा 10,031 वर पोहोचला. मृत्यूदरही वाढून 10.22 टक्के झाला.


20 मार्च
जगभरातील मृतांचा आकडा 11,387 झाला. यावेळी मृत्यूदर 11.06 टक्के होता.


21 मार्च
जगभरातील आकडा 1626 ने वाढला आणि मृत्यांची संख्या 13,013 वर पोहचली. मृत्यूदर 12 टक्क्यांवर पोहोचला.


22 मार्च
भारतात जनता कर्फ्यू लागू होता. त्यावेळी जगभरातील मृतांचा आकडा 14,615 वर गेला आणि मृत्यूदर 13 टक्के झाला.


पाच दिवसात साडेचार हजार रुग्णांचा मृत्यू


वरील आकडेवारीवर नजर टाकल्यास अवघ्या पाच दिवसात जवळपास साडेचार हजार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील ही आकडेवारी असली तरी ती भारतासाठी चिंतेंची बाब आहे. आपण जेवढा विचार करतोय त्यापेक्षा वेगाने हा व्हायरस पसरतो आहे.


चीन, इराण, इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांकडून भारताला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. या देशांनी केलेल्या चुका टाळणे भारतातसाठी गरजेचं आहे आणि शक्य आहे. भारतातही अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.


जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायसर पुढे अमेरिका, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलियासारखे अनेक मोठे देश हतबल दिसत आहेत. वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिल्यानंतर कुणाला वाचवायचं आणि कुणाला नाही, असा प्रश्न डॉक्टरांना पडत असल्याचं चित्र आहे.


भारतातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी सरकारच्या आवाहनाला आणि निर्णयांना पाठिंबा देणे गरजेचं आहे. सरकार आणि डॉक्टर जे सांगत आहेत, ते सर्वांनी ऐकलं पाहिजे. असं केलं तरच कोरोनाविरोधातील ही लढाई भारताला जिकणं शक्य होईल, अन्यथा कोरोनाचं पुढचं टार्गेट भारत असू शकतं.




संबंधित बातम्या