मुंबई : राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणे याला प्राधान्य आहे. यादृष्टीने केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. आज मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करत आहे त्यावर समाधान व्यक्त केले.


सध्या राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे 7 दिवसांचा आहे आणि तो 10 दिवसांपेक्षा जास्त करण्याचे सध्या ठरवले आहे. मृत्यू झालेल्यांत 77.9 टक्के रुग्णांमध्ये इतरही आजार होते. तसेच मरण पावलेले रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत असे लक्षात आले आहे. अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आले आहे. तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय पथक पुणे आणि परिसराचा दौरा करत आहे.

वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्याशिवाय या पथकांनी लॉकडाऊन उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, सामाजिक अंतराच्या निकषाचं पालन, आरोग्य विषयक सुविधांची सज्जता, आरोग्य व्यावसायिकांची सुरक्षा आणि मदत शिबिरांमधली मजुरांची स्थिती याचा आढावा घेतला तसेच सूचनाही केल्या.


पीपीई किट्सची आवश्यकता पुढील काळात आणखी लागू शकते. त्यामुळे आता अशी किट्स केंद्राने तातडीने उपलब्ध करणे महत्वाचे आहे. स्थानिकरित्या देखील काही कंपन्या असे कीट्स उत्पादित करीत आहेत. मात्र केंद्राने याबाबतीत त्वरित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय पथकाने रुग्णालयांतील सुविधा, क्वारंटाईन पद्धती, चाचण्या व या अनुषंगाने दिलेल्या सूचनांवर मुंबई आणि पुणे येथील प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरु करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


केंद्रीय पथकाच्या सूचना


संस्थात्मक क्वारंटाईन वाढविणे. अधिक चाचण्या करणे. विशेषत: झोपडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेणे, असे प्रसाधनगृह वापरणाऱ्या धारावीसारख्या भागांमध्ये त्याच परिसरात क्वारंटाईन न करता परिसराबाहेर दूर लोकांना क्वारंटाईन करणे.


कोव्हीड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करणे. लवकरात लवकर खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स सुरु करणे, जेणेकरून कोविड व्यतिरिक्त रुग्णांना देखील उपचार मिळावेत अशा सुचना मनोज जोशी यांनी केल्या.


संबंधित बातम्या