मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. अनंत करमुसे असे या तरूणाचे नाव असून तो कासारवडवली येथे राहायला आहे. वर्तक नगर पोलीस स्थानकांत यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी करत करमुसे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी राज्य सरकारला यावर 30 एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर आव्हाडांच्या बंगल्यावरील घटनेच्या दिवसाचं सीसीटिव्ही फूटेज तातडीनं हस्तगत करून ते ठाणे जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात जमा करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
तक्रारदार तरुणाच्या दाव्यानुसार जितेंद्र आव्हाड हे सत्ताधारी पक्षात असून ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस कदाचित निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. तेव्हा या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अनंत करमुसे यांनी समाज माध्यमांवर केलेल्या काही पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आव्हाड हे समोर उभे होते असेही या तरुणाचे म्हणणे आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असं सांगत उलट या तरुणावर दाभोळकर पानसरे यांच्या हत्येत या तरुणाचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
Lockdown | पंतप्रधान मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावा वाटतो : जितेंद्र आव्हाड
संबंधित बातम्या :