मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र याही परिस्थितीत काही जणांकडून अशा मास्कचा काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू परिसरात मास्कचा साठेबाजार करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास 15-20 कोटींचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थिचीचा आढावा घेतला.
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेतला तर मास्कची सर्वाधिक गरज डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेशी संबधित कर्मचाऱ्यांना आहे. मात्र असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मास्कचा साठेबाजार कुणी केला आणि अजून मास्कचा साठा केलाय का याची माहिती आता पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मास्कच्या साठेबाजाराबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: लक्ष घालून ही मोठी कारवाई केली आहे.
परिस्थिताचा गैरफायदा घेऊ नका : अजित पवार
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वेगाने होत आहे, त्यामुळे राज्यातील आणि देशातील स्थिती गंभीर आहे. राज्यावर आणि देशावर आलेलं हे मोठं संकट आहे. याही परिस्थितीत लोकं पैसे कमावण्याचा विचार करत असतील तर ते अत्यंच चुकीचं आहे. यातून आपण कोणत्या थराला जाऊन विचार करतोय, हे लक्षात आलं पाहिजे. जर कुणी याही परिस्थितीत चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचार कुणी करत असेल तर त्यांचावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. त्याच्या दोन पिढ्यांना ही कारवाई लक्षात राहील, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पैसा कधीही कमावता येतील, मात्र माणसाचा जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. त्यामुळे लोकांनी कृपया करुन असं वागू नका, परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका. लोकांपर्यत आहे तो माल कसा पोहोचले याचा विचार करा आणि सर्वांना सहकार्य करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
- Coronavirus | महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार, रुग्णांची संख्या 101 वर
- coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी
- Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?
- Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य?
- Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात