जळगाव : कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 33 जणांना मंगळवारी (19 मे) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना ही जिल्ह्यासाठी दिलासादायक आणि समाधानाची बाब आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये तसेच रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार मिळावेत. याकरीता जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 78 कोविड केअर सेंटर, 36 कोविड हेल्थ सेंटर तर 24 कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 29 टक्के म्हणजेच 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 318 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 105 रुग्ण अमळनेर तालुक्यातील आहे. तर त्या खालोखाल जळगाव शहर 67, भुसावळ शहर 62 रुग्ण आहे. असे असले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्येही सर्वाधिक 78 रुग्ण अमळनेरचे, भुसावळचे 9, जळगावचे 8, पाचोरा येथील 13 तर चोपडा व बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37,136 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 26,164 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 1325 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1765 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 15, 178 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 63.29 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
संबंधित बातम्या :
- मुंबईहून अकोल्याला पायी जाताना जळगावमध्ये अपहरण, 13 वर्षीय मुलगी अमरावतीत सापडली!
- सव्वाचार लाखांहून अधिक परप्रांतिय कामगारांना रेल्वेने घरी सोडले : गृहमंत्री अनिल देशमुख
- कर्नाटकमधल्या व्यक्तीचा गुजरातमध्ये मृत्यू, नियमांच्या कचाट्यात पार्थिवाची हेळसांड; अखेर कराडमध्ये दफनविधी