कोल्हापूर : नियमांच्या कचाट्यात एका पार्थिवारी 15 तासांपेक्षा जास्त वेळ हेळसांड झाल्याची घटना महाराष्ट्र-कर्नाटकच्या हद्दीत घडली आहे. मूळ कर्नाटकमधल्या एका 54 वर्षीय व्यक्तीचा गुजरातमध्ये मृत्यू झाला. परंतु कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमुळे त्यांचा मृतदेह कराडमध्ये दफन करण्याची वेळ आली.


कर्नाटकातील असिफ लतीफ सैयद (वय 54 वर्ष) कामानिमित्त गुजरातमधील भरुच इथे होते. 17 मे रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील कारवार इथे पोहोचवण्यासाठी गुजरातवरुन एक रुग्णवाहिका निघाली. महाराष्ट्राच्या हद्दीत म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोगनोळी नाका परिसरात ही रुग्णवाहिका पोहोचली. मात्र कर्नाटक राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेला आपल्या राज्यात प्रवेश दिला नाही. दिवसभर रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह तसाच ताटकळत ठेवण्यात आला होता. चालकाने कर्नाटक पोलिसांच्या दिवसभर विनवण्या केल्या. मात्र त्यांना कर्नाटक हद्दीत प्रवेश मिळाला नाही. अखेर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे तो कराड इथे दफन करण्यात आला. शासकीय नियमांमुळे दफन होण्यासाठी 15 तासांहून अधिक मृतदेहाची हेळसांड झाली.


गुजरातमध्ये त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने तिथला मुबारक नावाचा सामाजिक कार्यकर्ता आणि रुग्णवाहिकेचा चालक मकबूल असे दोघे असिफ सैयद यांचे पार्थिव घेऊन कारवारच्या दिशेने रवाना झाले. सोबत आवश्यक ती कागदपत्रे असल्याने त्यांना वाटेत कोणीही अडवले नाही. पार्थिव कर्नाटकच्या दिशेने जाणार असल्याने त्यांनी पुढे जाण्यास परवानगी दिली. मात्र पुढे महाराष्ट्रातून कारवारकडे जाणाऱ्या मार्गावर कोगनोळी टोल नाक्यावरील कर्नाटकच्या पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवली. सोबत कायदेशीर कागदपत्रे असताना आणि मृत व्यक्ती कर्नाटक राज्याची असतानाही 'कर'नाटकी प्रवृत्ती दाखवत या पोलिसांनी पुन्हा ही रुग्णवाहिका गुजरातला न्या, आम्ही कर्नाटक हद्दीत प्रवेश देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली.



नाईलाजाने या दोघांनी कोल्हापूरच्या मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची कल्पना दिली. आजरेकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला. 17 तारखेला असिफ सैयद यांचा झालेला मृत्यू, त्यानंतर पोलीस कारवाई, पोस्टमार्टेमसाठी गेलेला वेळ आणि पुन्हा गुजरातमधून महाराष्ट्रात येण्यासाठी गेलेला वेळ यामुळे मृतदेह कुजत चालला होता. त्यामुळे सैयद यांच्या नातेवाईकांनाकडून परवानगी घेतली. कोल्हापूरच्या बागल चौक कब्रस्तानात सैयद यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्याची तयारी आजरेकर यांनी दाखवली आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची परवानगी मागितली. देशमुख यांनी संवेदनशीलता दाखवत याबाबत बेळगावच्या पोलीस प्रमुखांशी चर्चा करु असे त्यांना सांगितले. पण ही चर्चा सुरु असतानाच कर्नाटक पोलिसांनी, रुग्णवाहिकेचा चालक मकबूल आणि सामाजिक कार्यकर्ता मुबारक यांना असिफ सैयद यांच्या पार्थिवासह पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आणून सोडले आणि पुन्हा गुजरातला जाण्याचे आदेश दिले. ही रुग्णवाहिका पुन्हा महाराष्ट्रात किणी टोल नाक्यावर आल्यानंतर या दोघांनी पुन्हा गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने मुबारक आणि मकबूल यांना रुग्णवाहिकेत बसवून पाठीमागे एक पोलीस वाहन पाठवून देत त्यांना पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर जाण्यास भाग पाडले.


पुढे सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील एका पोलीस चौकीच्या दारात थांबून त्यांनी पुन्हा आजरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना हकीकत सांगितली. आजरेकर यांनी जिल्हा पोलिस प्रमुख देशमुख यांना याबाबत सांगितले. देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षकाला विचारणा केली असता त्यांनी चक्क आपल्या वरिष्ठांची दिशाभूल करुन वेळ मारुन नेली. देशमुख यांनी किणी टोल नाक्यावर निरोप दिला की अॅम्ब्युलन्सला परत प्रवेश द्या. पण सांगली हद्दीतील चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका कोल्हापूरकडे सोडले नाही.


अखेर गणी आजरेकर यांनी कराडचे नगरसेवक फारुक पटवेकर याचा संपर्क साधून विनंती केली. पटवेगर यांनी देशमुख यांना विचारले, काय करु? यावर 'यह नेक काम रह गया, आप के नसीब में था' असे सांगून त्यांची समजूत काढली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी निर्विवादपणे मनाची संवेदनशीलता दाखवत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली होती. पण अल्लाहचीच जणू मर्जी असावी, त्यामुळेच इतके लोक मदतीला असून देखील असिफभाईंच्या पार्थिवाचा दफनविधी त्यांच्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत होऊ शकत नव्हता. शिवाय विलंब होत होता, त्याप्रमाणे त्यांच्या पार्थिवाची अवस्थाही बिकट होत होती. अखेर मनाचा हिय्या करुन गणी आजरेकर यांनी मुबारक आणि मकबूल यांना असिफभाईंच्या पार्थिवासह कराडच्या दिशेने जायला सांगितले. कोल्हापूरचे मौलाना मुबिन, गणी आजरेकर यांच्या विनंतीला मान देत कराडमध्ये पोहोचलेल्या असिफ सैयद यांच्या पार्थिवावर इस्लामिक रितीरिवाजाप्रमाणे कराडच्या कब्रस्थानात दफनविधीचे सोपस्कार पार पाडले. यासाठी कराडचे हाजी बरकत पटवेगार, साबीर मुल्ला, इरफान सैयद, झाकीर शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



प्रतिक्रिया


गणी आजरेकर (अध्यक्ष, मुस्लीम बोर्डिंग, कोल्हापूर)
कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आम्हीच सगळेच कोल्हापुरात नवीन येणाऱ्या रुग्णांच्या व्यवस्थेमध्ये व्यस्त होतो. अशा वेळेस मला संध्याकाळी मुबारक यांचा फोन आला. दिवसभर घडलेल्या घटनेबद्दलची त्यांनी मला माहिती दिली. मृतदेहातून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे त्यांचा दफनविधी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी मला सांगितलं. या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला, मुस्लीम बोर्डिंगच्या वतीने मृतदेह दफन करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही पोलिस अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे हा मृतदेह आम्हाला नाइलाजास्तव कराडमध्ये दफन करावा लागला. कोरोनाचे संकट संपूर्ण जगभरामध्ये आहे. सध्या माणसामाणसात अंतर निर्माण झालेला आहे. कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीशून्य भावना दाखवल्यामुळे एका मृतदेहाला पंधरा तासाहून अधिक काळ दफन होण्यासाठी वाट पहावी लागली याचंच दुःख वाटतं आहे.


फारुक पटवेकर (नगरसेवक कराड)


गणी आजरेकर यांनी मला ही संपूर्ण हकीकत सांगितली. अशा परिस्थितीत आपणाला माणुसकी दाखवावी लागेल. हे नेक काम आहे. असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही कोल्हापूर पोलीस प्रमुख यांना फोन करुन याबद्दलची खात्रीही केली आणि रात्री उशिरा सय्यद यांच्या पार्थिवावर इस्लामिक रितीरिवाजाप्रमाणे कराडच्या कब्रस्थानात दफन विधीचे सोपस्कार पार पाडले.