अमरावती : मुंबईहून अकोल्याकडे पायी जातान जळगावमध्ये अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अमरावतीमध्ये सापडली आहे. या मुलीला अमरावतीजवळील मुंबई-नागपूर महामार्गावरील लोणी टाकळीजवळ सोडून आरोपीने तिथून पळ काढला. पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलगी सध्या लोणी पोलीस स्टेशनमध्ये आहे.


काय आहे प्रकरण?
मुंबई इथल्या मुलुंड परिसरात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारं एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याला निघाले होतं. पायी जात असलेल्या या कुटुंबाला जळगावमधील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराने लिफ्ट देण्याची तयारी दाखवली होती. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने संबंधित कुटुंबातील 17 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलीस असल्याचा बहाणा करुन उतरण्यास सांगितले आणि पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसून जाऊ, आम्ही पुढे थांबतो अस सांगितलं.


मुंबईहून अकोल्याला पायी निघालेल्या कुटुंबातील मुलीचं जळगावमध्ये अपहरण


मुलीच्या भावाने यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरुन उतरुन पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण न दिसल्याने भावाने आपबिती आपल्या आई-वडिलांना सांगितली. घटनेचं गांभीर्य ओळखून कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपी आणि मुलीचा शोध घेत होते.


अमरावतीमध्ये मुलगी सापडली
अखेर आज सकाळी अमरावतीमध्ये ही मुलगी सापडली. या आरोपीने आपल्या दुचाकीवरुन काल (19 मे) दुपारी अडीचच्या सुमारास या मुलीला जळगावहून पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपीने तब्बल 270 किमीपर्यंत त्या मुलीला आणलं. मग तिला अमरावतीजवळील मुंबई-नागपूर महामार्गावरील लोणी टाकळीजवळ सोडून तिथून पळ काढाला. आज सकाळी अकराच्या सुमारास ही मुलगी रस्त्यावर फिरताना आढळली असताना पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणलं. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.


या प्रकरणातील आरोपी हा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथला असून गणेश बांगर असं त्याचं नाव आहे. याआधी या आरोपीवर तब्बल 10 विविध जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. ज्यामध्ये मुंबई, वाशिम, अकोला, यवतमाळ अशा जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे. जळगाव पोलीस अमरावतीच्या लोणी याठिकाणी आले असून थोड्याच वेळात त्या अपहरण झालेल्या मुलीला घेऊन जाणार आहे. सोबतच आरोपीचा शोध सुरू आहे.