अनिल देशमुख म्हणाले की, 19 मे च्या रात्री 9 वाजता पर्यंत महाराष्ट्रातील 426778 मजूरांसाठी 320 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून 51, लोकमान्य टिळक टर्मिनस हून 45, पुण्याहून 32, बोरिवलीहून 25 , वांद्रे टर्मिनसहून 22 व पनवेलहून 21 गाड्या सोडण्यात आल्या. या सर्वच मजूरांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलत आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मंगळवार रात्रीपर्यंत 325 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या, तर आज दिवसभरात 60 रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या 385 रेल्वे गाड्यांमधून 5 लाखांहून अधिक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात पोहोचतील, असं देखील देशमुख यांनी सांगितलं.
ज्या कामगारांचे नाव प्रवाशांच्या यादीमध्ये असेल किंवा ज्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला जाईल त्यांनीच फक्त रेल्वे स्थानकाजवळ जावे. या कामगारांच्या तिकीटाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे . कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यासाठी मुंबई पोलिस अहोरात्र काम करत असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतोय. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील 93 पोलिस ठाण्यांमध्ये मंत्रालयातील 40 वर्षांहून कमी वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.