नागपूर : भारत बायोटेकच्या स्वदेशी कोवॅक्सीन लसीच्या चाचणीचा तिसरा आणि अंतिम टप्पा आज नागपुरात संपुष्टात येणार आहे. तिन्ही टप्पे मिळून सुमारे 2 हजार नागपूरकरांना कोवॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत कोणाला ही साईड इफेक्ट झाले नसल्याचे चाचणी करणाऱ्या डॉक्टर्सचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर "हॉल विरीयॉन इनऍक्टीवेटेड वॅक्सीन" असलेली कोवॅक्सीन कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर ही तेवढीच परिणामकारक ठरेल असा ही चाचणी करणाऱ्या डॉक्टर्सचा दावा आहे.
शिवाय कोवॅक्सीनला साठवण्यासाठी फक्त 2 ते 8 डिग्री तापमानाची तर वॅक्सीन लावताना सामान्य तापमानाची (रूम टेम्परेचर) गरज असल्याने भारतीय हवामानात आणि भारतातील ग्रामीण परिस्थितीत कोवॅक्सीन इतर वॅक्सीनच्या तुलनेत जास्त यशस्वी ठरेल असे ही लसीकरण चाचणी प्रक्रियेशी जुळलेल्या डॉक्टर्सचे म्हणणे आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या कोवॅक्सीनच्या चाचणीचे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून नागपुरात हे तिन्ही टप्पे घेण्यात आले.
गिल्लूरकर रुग्णालयात पार पडलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 150 जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली होती. तर तिसऱ्या टप्प्यासाठी नागपुरात 1 हजार 500 जणांचे लसीकरण करायचे ठरले होते. मात्र, कोवॅक्सीनच्या तिसऱ्या चाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तसेच तिसऱ्या चाचणीचा बेस वाढवण्यासाठी भारत बायोटेकने नागपुरात चाचणी संख्या पंधराशे वरून वाढवत ती सतराशे पन्नास केली. आज नागपुरातील चाचण्या संपुष्टात येणार आहे. तिन्ही टप्पे मिळून सुमारे 2 हजार नागपूरकरांना कोवॅक्सीन लावण्यात आली असून कोणाला ही साईड इफेक्ट झाले नसल्याने कोरोनाला पराभूत करण्यासाठी भारताने विकसित केलेली स्वदेशी वॅक्सीन शंभर टक्के यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
तज्ज्ञ समितीकडून कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता
तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. आता डीसीजीआय देखील ही लस मंजूर करील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञ समितीने आता डीसीजीआयकडे या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूर करण्याची शिफारस केली आहे. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्ड लसीला तज्ज्ञ समितीने हिरवा कंदिल दाखवला आहे.
कोवॅक्सीन पहिली भारतीय लस
कोवॅक्सीन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. भारत बायोटेक आणि एनआयव्ही पुणे यांनी एकत्रितपणे ही लस तयार केली आहे. अशा प्रकारे, ही लस तज्ञ समितीने मंजूर केलेली दुसरी लस आहे.