मुंबई : कोरोना व्हायरसचं देशभर थैमान सुरु असताना पोलीस याही परिस्थितीत आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र चिंतेची बाब म्हणजे लॉकडाऊनच्या वेळी कामावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 67 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर गेल्या चार दिवसांमध्ये 281 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यभरात 1273 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यातील 50 टक्के कर्मचारी मुंबई पोलीस दलातील आहेत.


देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार पेक्षा अधिक झाला आहे. तर आतापर्यंत 1198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकट्या मुंबईमध्ये 20 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 734 लोकांचा मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 ते 1500 ने वाढत असल्याचं समोर येत आहे. काल म्हणजे 17 मे रोजी तर आतापर्यंत सर्वाधिक 2347 नवीन रुग्ण एका दिवसात आढळले. ज्यामध्ये फक्त मुंबईत 1500 रुग्ण होते. अशा परिस्थितीमध्येही पोलीस रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. नाकाबंदीमध्ये वाहनं आणि कागदपत्र तपासणे, विविध ठिकाणी गस्त घालणे, लोकांच्या संपर्कात येणे. या गोष्टींमुळे पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे.


मुंबईत पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, दोघे जखमी; मरिन ड्राईव्हवरील थरारक घटना


गेल्या 24 तासात राज्यामध्ये 67 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 9 अधिकारी आणि 61 पोलीस कर्मचारी आहेत. तर गेल्या 4 दिवसात 281 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये शुक्रवारी 69, शनिवारी 79, रविवारी 66 आणि आज 67 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यभरात 1273 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 8 पोलिसांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. सोलापूरमध्ये 1, नाशिकमध्ये 1, पुण्यात 1 पोलीस कोरोनामुळे मृत झाले आहेत.


राज्यात आतापर्यंत 131 पोलीस अधिकारी आणि 1142 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईतील स्थिती चिंताजनक आहे, कारण एकट्या मुंबईत 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनीही पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. लवकरात लवकर याची दखल घेत योग्य त्या उपाययोजना पोलिसांसाठी करायला हव्यात, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.