सांगली : सांगली जिल्ह्यात आणि खासकरून महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आलाय. संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणवर घेण्यात येत असून सध्या त्या शहरी भागात सुरू आहेत. लवकरच ग्रामीण भागात सुरू करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यात किमान 20 हजार रॅपिड अँटीजेन करण्यात येणार आहेत. यामध्ये 50 वर्षावरील व्यक्ती, कोमॉर्बीडीटी आहे अशा व्यक्ती, दाटीवाटीच्या लोकवस्तीमधील, कंटेन्मेंट झोनमध्ये प्राधान्याने या टेस्ट करण्यात येणार आहेत, असं जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महिती दिलीय.
रॅपिड अँटीजेन टेस्ट बद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असं स्पष्ट केले. स्वत:ची सुरक्षा आणि संसर्ग टाळणे या दोहोंसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट महत्वाची आहे. त्यामुळे याला सकारात्मक प्रतिसाद द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू असून नागरिकांनी या टेस्टसाठी घाबरून जाऊ नये, सदरची टेस्ट विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण असून यामध्ये कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही. जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे व कोरोना बाधित असणाऱ्या रूग्णांवर त्वरित उपचार करून प्रादुर्भावाला अटकाव करणे या टेस्टचा हेतू आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा रॅपिड अँटीजेन टेस्ट यंत्राणामार्फत सुरू आहेत. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये. स्वत:ची सुरक्षा व प्रादुर्भाव टाळणे या दोहोंसाठी ही टेस्ट महत्वाची आहे. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद द्यावा व या टेस्ट करून घ्याव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये कोराना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील. तर त्यांच्या समंतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जे रूग्ण् 60 वर्षावरील आहेत, तसेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब ,हृदयविकार, कॅन्सर, रोग प्रतिकार क्षमता कमी असणे, श्वसनाचे विकार, दमा आदी कोमॉर्बीडीटी आहेत, अशा रुग्णांवर सातत्याने मॉनिटरिंगची आवश्यकता आहे अशा व्यक्ती तसेच ज्या रूग्णांच्या घरी गृह विलगीकरणाकरिता स्वतंत्र दोन खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये स्वतंत्र शौचालय उपलब्ध नाहीत, तसेच ज्यांच्या घरात 18 ते 50 वयोगटातील कोणताही गंभीर आजार नसणारी काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध नाही, अशा व्यक्ती गृह विलगीकरणसाठी अपात्र असतील. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अथवा वैद्यकीय अधिकारी हे दररोज भेट देवून चौकशी करतील. त्याच बरोबर गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रूग्णांना तिसऱ्या, सातव्या व दहाव्या दिवशी वैद्यकीय अधिकारी प्राधान्याने भेट देतील. गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांस काही त्रास झाल्यास अशा रुग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात येईल. त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारचे दुखणे, लक्षणे अंगावर न काढता तात्काळ आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी, ज्यामुळे लवकर उपचार सुरू करून प्रादुर्भाव अटकाव करणे शक्य होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.