Rajesh Tope on Corona : राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. "येत्या मार्च महिन्यात राज्यातील निर्बंध शिथिल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा हीच मनीषा असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.  


"गेल्या दोन महिन्यांपेक्षा आता राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. पॉझिटिव्हिटीमध्येही घट होत आहे. शिवाय राज्यात लसीकरणही चांगल्या प्रमाणात झाले आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 93 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर 67 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. याबरोबरच 15 ते 18 या वयोगटातील मुलांचेही 57 टक्के लसीकरण झाले आहे. सध्याही लसीकरण चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत विचार सूरू आहेत. मुख्यमंत्र्यांचीही हिच इच्छा आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 


राजेश टोपे म्हणाले, राज्यातील कोरोना परिस्थितीवर टास्क फोर्ससोबतही चर्चा झाली आहे. टार्स फोर्सचेही मार्च महिन्यात निर्बंध कमी करावेत असे मत आहे. याबरोबरच केंद्र सरकारनेही राज्यांनी कोरोनाचे निर्बंध कमी करावेत असे सांगितले आहे. या सर्वच गोष्टींचा विचार करून राज्यातील निर्बंध मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात शिथिल केले जातील."  
 
दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 4 हजार 394  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याबरोबरच राज्यातील ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही घट होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात एकाही ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. 


महत्वाच्या बातम्या