Jitendra Awhad, Maharashtra Cabinet Minister : राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी भाजप नेत्यावर टीकास्त्र सोडले. जे फुकट वडापाव खातात ते तुमचं शहर काय सांभाळणार, त्यांची औकात नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर भाजप नेत्यांनी वडापाववर ताव मारल्याचे फोटो व्हायरल झाले होते. या नेत्यांनी वडापाव विकणाऱ्यांना पैसेही दिले नव्हते, असेही समोर आले होते. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 


राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड शनिवारी उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या कार्यकारणीच्या पद वाटपासाठी आले होते. यावेळी आव्हाड यांनी महाविकास आघाडीसाठी आम्ही तयार आहोत असे सांगितले. तर भाजपवर टीका करताना बोलले की, जे फुकट वडापाव खातात ते तुमचं शहर काय सांभाळणार? त्यांची औकात नाही. दरम्यान या कार्यक्रममध्ये आव्हाड येण्यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केल्याचेही समोर आले. 


महाविकास आघाडीसाठी आम्ही कायम हात पुढे करतोय, चलो हात मिळाओ ही आमची भूमिका आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचा आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईत आता महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असे संकेत मिळत आहेत. तर ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडापावच्या दुकानात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी वडापावचा आस्वाद घेतला. त्यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला. त्यानंतर ठाणे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर त्यांनी वडापाववर ताव मारला. मात्र वडापाव आणि अनेक भजी प्लेट खाल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते बिल न देताच निघून गेल्याची माहिती समोर आली. त्या बिलाचे पैसे कोण देणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण या घटनेचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वडापावचे पैसे भरले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 


दरम्यान या राष्ट्रवादीच्या कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यानी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यानी खुर्च्या फेकून खुर्च्यांची तोडफोड केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या कार्यक्रमला उपस्थित राहण्याच्या पूर्वी हा सगळा गोंधळ झाला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. मात्र नक्की हा गोंधळ कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.