सांगली : 22 मार्च पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सांगली आणि तासगाव बाजार समितीतील बेदाण्याचे सौदे अनेक दिवस बंद होते. 29 एप्रिल रोजी सांगली बाजार समितीमध्ये हळदीचे ऑनलाईन सौदे पार पडले होते. हळदीचे सौदे यशस्वीरित्या पार पडल्याने बेदाण्याचेही ऑनलाईन सौदे सांगली आणि तासगावमध्ये करण्यात यावेत अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी, बेदाणा व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी बेदाण्याचे सांगली आणि तासगाव बाजार समितीत सौदे सुरू करण्याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगली आणि तासगाव बाजार समितीच्या आवारातील हॉलमध्ये बेदाण्याचे ऑनलाईन सौदे सुरु करण्यात आले आहेत.


सांगलीत 125 लॉट्सचे सॅम्पल पाहणीसाठी ठेवण्यात आलेले होते. खरेदीदारांनी दुपारी 1 ते 2 या एका तासाच्या कालावधीमध्ये सर्व सॅम्पल्स पाहून ऑनलाईन बोली लावली. प्रायोगीक तत्वावर सुरु केलेले बेदाण्याचे ऑनलाईन सौदे यशस्वी झाले आहेत. 940 क्विंटल बेदाण्याची विक्री झालेली असून उच्चांकी दर प्रती किलो 185 रूपये तर सरासरी 140 ते 165 रूपये प्रती किलो मिळालेला आहे. सौदे प्रक्रिया सुरु असताना उपस्थित शेतकरी आणि खरेदीदार यांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले. हळदीच्या ऑनलाईन सौद्याप्रमाणे बेदाण्याचे सौदे ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत पालक मंत्री जयंत पाटील यांनी सुचित केले होते.



तासगाव बाजार समितीत सौद्यासाठी 1760 बॉक्सची आवक झाली असून 970 बॉक्सची विक्री झाली. नव्या पद्धतीने सौदे सुरु केल्याने केवळ एका अडत व्यापाऱ्याचे सौदे काढण्यात आले होते. बेदाण्याला सरासरी प्रति किलोस 110 ते 160 रुपये असा दर मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले तासगाव बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सुरक्षित अंतराचे पालन करत सुरुवात झाली आहे . बाजार आवारात 80 बेदाणा अडत दुकाने आहेत. येथील बेदाणा सेल हॉलमध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या तीन दिवशी बेदाणा सौदे होत आहेत. सौद्यात अडत व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि खरेदीदार अशा केवळ तिघांच्या समोर सर्व खबरदारी घेऊन सौदे काढण्यात आले. सध्या सौद्यामध्ये आलेल्या अडचणींचा विचार करुन पुढील सौद्यात बदल केले जाणार आहे .



जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे आणि सांगलीबाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी मागील आठवड्यामध्ये दोन वेळा बेदाण्याचे आडते आणि खरेदीदार यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या बेदाण्यासंदर्भात सर्व तांत्रिक बाबी आणि अडचणी समजून घेतल्या. त्यावर उपाययोजना करून दिनांक 13 मे 2020 पासून बेदाण्याचे ऑनलाईन सौदे सरू करण्याचे निश्चित झाले होते. सद्यस्थितीमध्ये सांगली परिसरातील कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा साठवणूक क्षमता पुर्ण होत आलेली आहे. बेदाण्याचे सौदे निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बेदाण्याचे ऑनलाईन सौदे प्रक्रिया सुरु झालेली असल्याने बेदाण्यास जास्तीत जास्त दर मिळू शकेल तसेच बेदाणा विक्रीतून रक्कम मिळणार असल्याने बेदाणा उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापुढेही नियमितपणे ऑनलाईन बेदाण्याचे सौदे घेण्यात येतील ज्यामुळे सौदे करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळता येईल असे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या बेदाण्यासाठी जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बेदाणा आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे.