मुंबई : एसटीच्या फेऱ्या कमी होणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच या एसटीच्या फेऱ्या असतील, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. तर सध्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासावरही काही निर्बंध आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. तसेच विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेच्या प्राणांची आम्हाला पर्वा असल्याचंही अनिल परब बोलताना म्हणाले. 


अनिल परब यांनी बोलताना सांगितलं की, "नव्या निर्बंधांनुसार, जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण त्या केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच सुरु राहतील. यासंदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाइन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील."


अनिल परब म्हणाले की, "त्या संदर्भात आता जे काही निकष आहेत, जिल्हाबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचं? कशा पद्धतीने ठेवायचं? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयाब बैठक होणार आहे." तसेच याकाळात एसटी संख्या देखील कमी होईल, कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच एसटी सुरु राहणार असल्यामुळे एसटींची संख्या कमी राहिल, असं अनिल परब म्हणाले. त्याचप्रमाणे शासनाच्या गाइडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर लोकं जाणार असतील, तर सरकारने म्हटल्यानुसार, त्यांना हातावर शिक्के मारून 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन ठेवलं जाईल, अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. 


"विरोधक काय टीका करत आहेत, यापेक्षा लोकांचे प्राण वाचवणं आम्हाला जास्त गरजेचं आहे, त्यासाठी जे काही निर्बंध लावायचे आहेत, यामुळे जी काही रूग्णसंख्या वाढते आहे, ते घटवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्रेक द चेन अंतर्गत हे काम सुरु आहे. त्यामुळे आता कोण काय बोलतं यापेक्षा लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, हे पाहणं महत्वाचं आहे.", असं अनिल परब म्हणाले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या काय सवलती देता येतील, त्यांना कशाप्रकारे या रोगापासून वाचवता येईल? त्यांच्यासाठीच्या गाईडलाईन्स, यासंदर्भातील बैठक घेण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.