Maharashtra Corona Crisis: जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गेल्या तीन दिवसात साडेतीन हजार नव्या रुग्णांची भर
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. मागील तीन दिवसात साडेतीन हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आजपर्यंत 80 हजार 786 इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 514 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनाच्या बाबतीत जळगाव जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट राहिला आहे. एवढेच नव्हे मृत्यूदराच्या बाबतही जळगाव जागतिक पातळीवर पुढे राहिले आहे. कोरोनाच्या बाबत जळगावची देशभर ओळख झाल्यानंतर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाल्याचं दिसून आल्याने अनेक नागरिक कोरोना बाबतचे नियमांचे पालन करीत नसल्याचं दिसून आले होते. त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा नव्याने कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
दिवसागणिक झपाट्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या तीनच दिवसात जळगाव जिल्ह्यात 3 हजार 407 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 36 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनतेला मास्क लावण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन करीत आहेत. मात्र, अनेक नागरिक प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात पाहिजे ते यश मिळत नसल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट
राज्यात काल (बुधवारी 25 मार्च) विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, काल नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.