शिर्डी : राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर राज्यातील बहुतेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले ‘बाह्यरुग्ण’ विभाग बंद केले होते. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाकडून वैद्यकीय व्यावसायिकांना आपापले बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र आपल्याकडे पुरेशा सुरक्षा साधनांची (पीपीई किट) अनुपलब्धता असल्याने आपण धोका पत्करु शकत नाही, असे म्हणत बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने बंदच ठेवले होते.


याबाबत प्रशासनाने इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा या दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन कोरोनासारखीच लक्षणे असणार्‍या रुग्णांची तपासणी करण्यासाठी संगमनेर शहरात अनोखा उपक्रम राबवत ‘कोविड 19 रुग्णालय सुरू केलं. कोरोनाची लक्षण असणारी सर्व रुग्णसेवा आता एकच छताखाली होणार आहे. खाजगी डॉक्टर दररोज साखळी पद्धतीने याठिकाणी सेवा देणार आहेत.



गेल्या 19 मार्चपासून राज्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला या विषाणूंची लागण होवू नये म्हणून संगमनेर तालुक्यातील बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापले बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवणेच पसंद केले. त्यामुळे सामान्य आजार असलेल्या रुग्णांची परवड होवू लागल्याने व त्यातच सर्दी, खोकला यासारख्या किरकोळ आजाराच्या रुग्णांना थेट कुटीर रुग्णालयात धाडण्यात येवू लागल्याने शासकीय वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली होती.


याबाबत संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा या दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देतांना या दोन्ही संस्थांशी संलग्न असणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांनी आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवल्यास एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी एकाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करुन तेथे साखळी पद्धतीने या दोन्ही संस्थांचे सदस्य रुग्ण तपासणी करतील असे जाहीर केले. या शहरात असे रुग्णालय सुरू झाले आहे.


संगमनेरच्या प्रशासनाने संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयाला ‘कोविड 19’ साठी सज्ज केले आहे. यासोबतच पठारभागातील घारगाव, साकूर यासह तळेगाव व निमोण येथेही असेच बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची स्क्रिनींग करुन शारीरिक तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास अशा रुग्णाचे ‘स्वॅब’ घेवून ते तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.


या दवाखान्यांमध्ये सेवा देणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांना पीपीई किट दिली जाणार आहे. कोरोनामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण होते. त्यामुळे सामान्य रुग्णांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न उभा राहिला होता. मात्र प्रशासनाने वैद्यकीय व्यावसायिकांशी समन्वय साधून यातून यशस्वी मार्ग काढला आहे. उद्यापासून सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे असणार्‍या रुग्णांनी वरील ठिकाणी तपासणी होणार असल्याने त्यांनी तेथेच संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे प्रयोग राज्यभर राबविले गेल्यास इतर आजार असणाऱ्या रुग्णाची दखल घेतली जाईल तर खाजगी डॉक्टर व्यावसायिक सुद्धा सुरक्षित राहतील.


संबंधित बातम्या




Corona Around the World | जगभरात कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती काय आहे?