मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात 31 हजार झाडांची कत्तल होणार आहे. रत्नागिरीतून महामार्ग रुंदीकरणाच्या पुढच्या टप्प्याचं काम या महिन्यात सुरु होणार आहे. संगमेश्वर ते लांजा  तालुक्यातील 91 किलोमीटरच्या या मार्गात तब्बल 31 हजार वृक्षांची बळी जाणार आहे. पण, यातील साडेचार हजार झाडांचे पुन:रोपण शक्य आहे. त्यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.


महामार्गालगत नवीन वृक्षारोपण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग बिहार पॅटर्न राबवणार आहे. मार्गालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना ५० झाडांची लागवड आणि संवर्धन अशी दुहेरी जबाबदारी दिली जाणार आहे.

ही ५० झाडे जगल्यानंतर तीन वर्षांनी या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मोबदला दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे वृक्षतोडीमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसानदेखील भरून काढता येण्यासारखे आहे.