Mumbai News Update : डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखा बाळासाहेबांच्या शिवसेनेने ताब्यात घेतली आहे. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शाखा ताब्यात घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावरून जोरदार टीका केलीय.  "मुघलांनी जशी कपट नीती वापरत शिवरायांचे गड ताब्यात घेतले. तसेच मिंधे गट मुघल नीती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करत आहे, असा हल्लाबोल केदार दिघे यांनी केलाय. 


27 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेने ताबा घेतला. जागा खरेदीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ही जागा ताब्यात घेतल्याचं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पत्रकार परिषद घेऊन  उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करुन ही शाखा आम्ही विकत घेतल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी  आम्ही न्यायालयीन लढा लढणार. आता जे काही सुरु आहे ते चुकीचे आहे अशी टीका केली. त्यांनतर आता या वादात ठाकरे गटातील ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी उडी घेतली आहे.


केदार दिघे यांनी ट्वीट करत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. कपटनीतीने मुघलांनी जसे शिवाजी महाराज यांचे गड ताब्यात घेतले. तसेच मिंधे गट मुघल नीती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करत आहेत. शिंदे गटाने  एक गोष्ट लक्षात घ्यावी. कपटनीतीने गड बळकवणाऱ्या मुघलांना धडा शिकवून शिवरायांनी सर्व गड पुन्हा ताब्यात घेतले होते. शिवरायांचा महाराष्ट्र गद्दारांना क्षमा करत नाही, असे दिघे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. दिघे यांच्या या टिकेला शिंदे गटातील युवा सेना कार्यकारणी सदस्य दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय.  "बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या जनतेच्या शाखा ताब्यात घेत भाडे तत्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे. शिवसेनाची शाखा ही खऱ्या शिवसेनेची बाळासाहेबांच्या शिवसेनाची आहे. ही शाखा योग्य ती कादेशीर प्रक्रिया करुन घेण्यात आली आहे, असे ट्विट म्हात्रे यांनी केलंय. 
 
दोन्ही गटातील वाद टोकाला 
दरम्यान, शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयावरून आता दोन्ही गटात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाने शाखा ताब्यात घेतल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 27 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत बसवत वादावर पडदा टाकला आहे.