Milind Narvekar Security : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काल काढण्याचे आदेश दिले. मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे मागच्या काही काळापासून नव्या सरकारसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा मात्र जैसे थे ठेवण्यात आलेली आहे. तर काहींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरूनच आता एक राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगू लागली आहे.
महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा शुक्रवारी अचानक शिंदे सरकारने रद्द केली आणि त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे नव्या सरकारने नार्वेकर, आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना अभय दिलं आहे. त्यातही मिलींद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नार्वेकरांवर सरकार इतकं मेहरबान का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, नार्वेकरांच्या घरी गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर नार्वेकर आता शिंदे गटाला पाठींबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर काहीच दिवसांत नार्वेकर यांच्या जागी रवी म्हात्रे यांची नेमणूक झाली. त्यानंतर नार्वेकरांबाबत शिवसैनिकांमध्ये पसरलेली नाराजी यामुळे त्यांना धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊनच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.
मुळात सुरक्षा काढण्यापूर्वी आणि सुरक्षा पुरवण्यापूर्वी गृह खात्याच्या दोन कमिटी असतात. यामधे एका कमिटीमध्ये राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि इतर पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ही कमिटी कुणाला सुरक्षा द्यायची आणि कोणाची सुरक्षा काढायची याचा निर्णय घेते आणि तसा अहवाल दुसऱ्या कमिटीला देते. दुसऱ्या कमिटीमध्ये राज्याचे मुख्य सचिव, राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख, पोलीस महासंचालक, यांचा समावेश असतो आणि त्या समितीने दिलेल्या निर्णयानुसार काही नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे तर काही नेत्यांची सूरक्षा कमी करण्यात आली आहे.
सुरक्षा रद्द करण्यात आलेले प्रमुख नेते -
वरुण सरदेसाई
छगन भुजबळ
बाळासाहेब थोरात
नितीन राऊत
नाना पटोले
जयंत पाटील
सतेज पाटील
संजय राऊत
विजय वडेट्टीवार
धनंजय मुंडे
भास्कर जाधव
नवाब मलिक
नगरहरी झिरवळ
सुनील केदारे
अनिल परब
सुरक्षा कायम असलेले नेते
मिलिंद नार्वेकर
अशोक चव्हाण
जितेंद्र आव्हाड
अमित देशमुख
विश्वजीत कदम
वर्षा गायकवाड
यशोमती ठाकूर
के सी पाडवी
मिलिंद नार्वेकरांसोबतच सुरक्षा कायम ठेवण्यात आलेल्यांमध्ये चर्चेत असणारी नावे म्हणजेच जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांची आहेत. कारण जितेंद्र आव्हाड यांची एमसीए निवडणुकीच्यावेळी शिंदे फडणवीस यांच्यासोबत असणारी जवळीकता लपून राहिलेली नाही. तर अशोक चव्हाण यांची विश्वासदर्शक ठऱावावेळी असलेली अनुपस्थिती चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर चव्हाण भाजपवासी होणार अशी देखील चर्चा रंगली होती. विश्वसनीय सूत्रांचा माहितीनुसार शिवसेना भाजप सरकारच्या काळात जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून असलेला थ्रेड यामुळे पुन्हा सुरक्षा बहाल करण्यात आली होती. आता देखील हीच परिस्थिती असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था जैसे थे ठेवण्यात आली आहे.