Nana Patole on Worli Hit And Run Accident मुंबई : वरळीत (Worli News) शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारनं (White BMW Car) महिलेला चिरडलं (Heat And Run) आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) उपनेत्याला ताब्यात घेतलं आहे. तर त्याचा मुलगा फरार मिहीर शहा याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानं देश हादरला होता. अशातच देशाच्या आर्थिक राजधानीत घडलेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
सत्ताधारी त्यांच्या बगलबच्चांना पाठिंबा देत आहे- नाना पटोले
अशातच आता या अपघातातील कार चालक आणि इतरांनी मद्यप्राशन केलं असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. याबाबत आता वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगला निशाणा साधला असून सत्तेमध्ये असलेले लोकांना आणि त्यांच्या बगलबच्चांना हे सरकार पाठिंबा देत आहे. तसेच सामान्य जनतेला चिरडण्याचा अधिकार देखील त्यांना या सरकारने दिलाय, असा घणाघाती आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते गोंदिया येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसआयटीच्या मार्फत चौकशी नेमून या बाबत अधिक तपास व्हावा, ही मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आपल्या खुर्च्या वाकविण्याकरिता घोटाळा करणाऱ्या लोकांना सोबत घेत आहे, आणि त्यातूनच या संदर्भात लोकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला आहे. नागरिकांकडून देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार याबाबत थोडे देखील गंभीर नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे."
इतर महत्वाच्या बातम्या