Maharashtra Assembly Election 2024 नागपूर :  महाराष्ट्रात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कालांतराने वातावरणामुळे त्यालाही गुलाबी अळीचा प्रादुर्भाव होत असतो. सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली देखील गुलाबी आळी आहे आणि या अळीपासून नुकसानच होत आहे. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. गुरुवारपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) नाशिकमधून सुरु झाली आहे.


दरम्यान, शुक्रवारी निफाड (Niphad) येथे झालेल्या सभेतून अजित पवार बोलत होते. मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. गुलाबी स्वप्न दाखवत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे, असे वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं. अजित पवारांच्या याच वक्तव्यावरुन आता नाना पटोलेंनी टोला लगावला आहे. मला गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही, मात्र गुलाबी अळीचा प्रादुर्भाव असतो तो असाच असल्याचेही ते म्हणाले.


महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा 


सरकार प्रसिद्धीसाठी 270 कोटीचा जनतेच्या घामाचा पैसा खर्च करत आहेत. त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आम्ही पुढे दाखवू. सध्या महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला पराभूत करू, अशी भूमिका महाविकास आघाडीतील आमची सगळ्यांची आहे. असेही नाना पटोले म्हणले.


शरद पवारांनी त्यांच्या पक्षात काय काय निर्णय घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पक्ष सोडून जे गेले आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे ती त्यांनी ठरवायचे आहे. भाजपच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचारचे पुरावे आमच्या कडे आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी सुरुवात करावी, मग आम्ही कशी सुरुवात करतो. हे सर्वांना दिसेल, असेही नाना पटोले म्हणले. 


काय म्हणाले होते अजित पवार?


मी आता दुसऱ्यावर टिकाच करणार नाही. माझ्याकडे सांगण्यासाठी खूप कामे आहेत. मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. गुलाबी स्वप्न दाखवत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे. नाशिक जिल्हा बँक सुरळीत सुरू करणार आहे. बँक कोणी मातीत घातली हे तुम्हाला माहित आहे. त्यावर जास्त बोलणार नाही ज्यांनी मातीत घातली त्यांना निवडून देऊ नका, असे अजित पवारांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा