नागपूर : पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं राज्यभरातले शेतकरी अडचणीत आलेले आहेत. याच निराशेतून नागपूरच्या काही शेतकऱ्यांनी मिरचीचं पिक जाळलं, मात्र जळत्या पिकासोबत फोटोसेशन करणाऱ्या काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं नागपुरातील कुही तालुक्यातील शेतकरीही संतापले आहेत. त्यांनी आपल्या शेतातील मिरचीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. ट्रॅक्टरनं अवघं पिक उपटून काढल्यानंतर ते जाळून टाकण्यात आलं.
यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि इतरही काही नेते या शेतावर उपस्थित होते. नेत्यांच्या समोरच पिकाची धूळधाण होत असतानाही त्यांनी शेतकऱ्याला तर थांबवलं नाहीच. उलट या जळत्या पिकासोबत त्यांनी फोटोसेशनही केल्याचा आरोप होत आहे.
अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी त्याच्या पिकाचं नुकसान पाहणाऱ्या नेत्यांबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.