भंडारा : काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याविरोधात भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर मोदी' नावाच्या गाव गुंडाला भंडारा जिल्ह्यातील पालादूर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती आज नाना पटोले यांनी दिली होती. परंतु, आम्ही अशा कोणत्याही व्यक्तीला अटक केली नाही अशी माहिती आता पालादूर पोलिसांनी दिली आहे. 


नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भंडारा, नाशिक आणि नागपूरमध्ये त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडत नाना पटोले यांनी, मी ज्या मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो आहे त्याला भंडारा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. परंतु, पोलिसांनी याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. 


"पोलिसांनी कुठल्याही मोदी नावाच्या व्यक्तीला अटक केली नाही. 16 तारखेला घडलेल्या घटनेचा आम्ही तपास करत आहोत. तपासानंतर जे निष्पन्न होईल त्यावर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी दिली आहे.  


नागपूर विमानतळावर नाना पटोले यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले होते की,  "भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडले आहे. पकडलेल्या मोदींविरोधात जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत आहेत. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने माझ्या अटकेची भाषा करत आहेत. त्यापेक्षा देशाला लुटून पळालेल्या नीरव मोदी आणि ललीत मोदींवर कारवाई करा." 


महत्वाच्या बातम्या