मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्समधील सदस्य सकारात्मक असून आज होणाऱ्या बैठकीत त्या संबंधी निर्णय होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून  पुनर्विचार केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. 


चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. बकुळ पारेख म्हणाले की, "ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर  ज्याप्रकारे कोरोना रुग्ण संख्या राज्यात वाढत होती, ते पाहता अनेक पालक आपल्या मुलांना अशा स्थितीत शाळेत  पाठवण्यास तयार नव्हते. तेव्हा सरकारला वाटलं की 10 ते 15 दिवस राज्यभरात शाळा बंद ठेवाव्यात आणि नंतर पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेऊ. मला वैयक्तिक असं वाटतं की शाळा लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरू कराव्यात. घरी बसून लहान मुलं कंटाळताय. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळ शाळा पुन्हा एकदा सुरू होईल का हे माहीत नाही. पण जिथे कोरोना रुग्ण कमी आहेत, जिथे वातावरण शाळा सुरू करण्यास योग्य आहे, जिथे पालक सुद्धा शाळेत पाठवायला तयार आहेत तिथे शाळा सुरू करायला काहीच हरकत नाही."


मुंबईमध्ये अजून आठवडा दहा दिवस शाळा सुरू करण्याबाबत वाट पहावी. जर केसेस आणखी कमी झाल्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही. आम्ही टास्क फोर्स सदस्य सायंटिफिक बेसिसवर निर्णय घेऊन कंबाईन आमचं मत राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचं डॉ. बकुळ पारेख म्हणाले.


दरम्यान, महाराष्ट्रातील मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या मुंबई वगळता राज्यातील शाळा सोमवार, 17 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेशी संलग्नित इंग्लिश स्कूल संस्थाचालकांनी घेतला आहे. या शाळांमध्ये पालकांचे संमती पत्र घेऊनच शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन ( मेस्टा) चे अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली. 


महाराष्ट्रात मेस्टा संघटनेशी संलग्न 18 हजार शाळा आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची मेस्टा या संघटनेने तयारी दर्शवली आहे.


 LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha