Nana Patole On Prakash Ambedkar : येत्या 4 तारखेला मी अकोल्यात जाणार असून त्यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या आरोपांना त्यांच्याच अकोल्यात मी उत्तर देणार असल्याचे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 2014 ते 2019 आणि आता कोण मतांचे विभाजन करतंय, कोण भाजपला मदत करतंय, हे सगळ आम्ही त्यावेळी सांगू. त्यामुळं या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी 4 तारखेलाचं देणार असल्याचेही नाना पटोले म्हणालेय. ते आज भंडारा येथे आले असता त्यावेळी ते बोलत होते. 


मला सातत्यानं टार्चर करण्याचा प्रयत्न


गेल्या अडीच महिन्यांपासून मला सातत्यानं टार्चर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मी पण ओबीसी समाजाचा आहे, शेतकरी आहे. मात्र, वंचितची भाषा आज कळायला मार्ग नाही. मात्र, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही हे सगळे प्रश्न अकोल्यात विचारू. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका मांडली, तशीच आमचीही भूमिका आम्ही तिथं जावून मांडू, असे म्हणत नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडरांवर प्रतिहल्ला केलाय . प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप करताना, नागपूरच्या भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची चिंता असल्याचा आरोप केला होता. त्यावर नाना पटोले यांनी आज आपले मौन सोडत प्रत्युत्तर दिलंय.


भाजपला परमात्मा एक सेवकांमध्ये तेढ निर्माण करायचाय


भाजपचे सरकार राज्यात असून तेच या बागेश्वर बाबांना सहकार्य करत आहे. ते वक्तव्य बाबाच्या तोंडातलं नसून ते भाजपचं वक्तव्य आहे. परमात्मा एकच्या सर्व सेवकांनी बागेश्वर बाबांना माफी मागायला सांगितले होते. मात्र त्यांनी अजूनपर्यंत ती मागितली नाही. ते मुजोरासारखे फिरत आहेत आणि त्यांना एसपी आणि पूर्ण पोलिसांचे प्रोटेक्शन आहे. याचाच अर्थ असा की, भाजपला परमात्मा एक सेवकांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. म्हणून मी सांगितलं की बाबा जुमदेव यांनी मोठ्या परिश्रमानी मानवधर्माचा प्रचार केला. शोषित पीडित लोकांना मुख्य प्रवाहात आणलं. व्यसनाधीन समाजाला व्यसनाच्या बाहेर केलं आणि आज सुखी कुटुंब म्हणून अनेक कुटुंब जगताना आपण पाहतो आहे. 


भाजपला बाबा जुमदेवजींच्या विचारांना संपुष्टात आणयचंय  


हीच गोष्ट भाजपला आणि भाजपच्या नेत्यांच्या पोटात दुखते आहे. नागपूरात भाजपचाच एक मोठा नेता असून त्याच्या दारूच्या फॅक्टऱ्या आहेत. तर आता भाजप आणि त्यांचे नेते हे दारू निर्माता आहेत. बाबा जुमदेवजींनी व्यसनाधीन समाजाला बाहेर काढलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले असून आज त्यांचे घर सुखी झाले आहे. पण त्यांना आज दारू पिणारा समाज पाहिजे. म्हणूनच अशा बाबांना आणून बाबा जुमदेवजीचे विचारांना संपुष्टात आणण्याचे पाप करायला हे भाजप सरकार निघालय का? याचे उत्तर भाजपला द्यावं लागेल, असे देखील नाना पटोले म्हणाले. 


परमात्मा एकच्या सेवकांबद्दल जे वक्तव्य यांनी केला आहे त्याबद्दल सेवक यांना सोडणार नाही. सेवकांनी काल निर्धार केला आहे आणि म्हणून आज या सुरक्षेमध्ये एसपी त्यांना फिरवते असल्याचेही पटोले म्हणाले. पोलिसांनीही एक लक्षात घेतलं पाहिजे आचारसंहिता सुरू आहे आणि अशा गुन्हेगार माणसाला सुरक्षा देणं हे बरोबर नाही. याची नोंद सुद्धा पोलीस अधीक्षकांनी घ्यावी. असा आमचा इशारा असल्याचे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.