Lok Sabha Electio 2024 :  देशात जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात सत्ताधाऱ्यांना लोकशाही जिवंत ठेवायची नाहीये. सर्व विरोधक संपवून टाकायचे, त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ज्याप्रमाणे रशियामध्ये पुतीन करत आहेत त्याच प्रकारचा घाट या देशातील सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. संविधानावरचे पान तेच ठेवायचे, मात्र आत पूर्ण बदल करायचा आणि वर संविधान शिल्लक आहे अशी बोंब फिरवायची. अशा पद्धतीने या देशाची वाटचाल लोकशाही संपवण्याकडे होत असल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.


विविध शासकीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा सातत्याने प्रयत्न सध्या सुरू आहे. अशातच राजकारणासाठी गोठवलेली खाती असतील किंवा इतर अनेक प्रकार बघता, आगामी काळात जनतेचा इतका भयंकर उद्रेक होईल कि जनता सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती या लोकांनी देशात आणल्याचे देखील विजय वडट्टीवार म्हणाले. ते आज नागपूरात बोलत होते.  


...तर सत्ताधाऱ्यांचे पतन झाल्याशिवाय राहणार नाही


सत्तेचा मुकुट कायम आमच्याच डोक्यावर राहील, अशा अविर्भावात सत्ताधारी सध्या वावरत आहे. त्या पलीकडे जाऊन देशात विरोधकच राहिले नाही तर देशाला हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यामुळे कधी नव्हे ते देशाचे संविधान, लोकशाही ही आगामी काळात शिल्लक राहील की नाही हा मोठा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे. असे असले तरी जनता या सर्व प्रकाराचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील विजय वडट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला. याची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असून सत्ताधाऱ्यांचे पतन झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही वडट्टीवार म्हणाले. 


वंचितसाठी अकोल्याच्या जागे संदर्भात पुनर्विचार व्हावा


वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या सात जागांसाठी पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागे संदर्भात पुनर्विचार व्हावा याबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची मागणी पोहोचवली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यताही विजय वडट्टीवारांनी बोलून दाखवली आहे. असे असताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागे बद्दल तिढा अद्याप कायम असल्याने त्यावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे, तसेच कुठेतरी जाऊन हा वाद मिटला पाहिजे. अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कारण महाविकास आघाडीतील प्रत्येकाचा उद्देश एकच असल्याने या देशातील लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्वांची एकजूट होणे ही काळाची गरज लक्षात घेता एकत्र येणे हे क्रमप्राप्त असल्याचेही विजय वडट्टीवार म्हणाले. 


त्यांनी नैतिकता तरी कुठे शिल्लक ठेवली?


शिवसेना शिंदे गटामध्ये नुकतेच अभिनेता गोविंदाने पक्षप्रवेश केला असून त्यावर भाष्य करताना विजय वडट्टीवार यांनी खोचक टोला लगावत भाष्य केले आहे. गोविंदा यांना प्रचार करण्यासाठी मोठे पॅकेज दिले असेल. ते अनेकांच्या प्रोग्रामला जात होते. त्यांना कुठे आता विषय उरला होता. कुठेतरी जायचं नाच-गाणं करायचं आणि त्या मोबदल्यात मानधन मिळवायचं, हाच कार्यक्रम त्यांचा सुरू होता. सत्तेत असलेल्यांना दाऊदही चालतो आणि दाऊदचा हस्तकही चालतो, त्यात नवल असे काही नाही. याच गोविंदावर कधीकाळी भाजपच्या आमदारांनी गंभीर आरोप केले आहेत. एखाद्या अभिनेता म्हणून लोक त्यांना बघायला येतील. मात्र त्या मोबदल्यात मत थोडीचं देणार आहेत. किंबहुना मत देण्यासाठी त्यांनी नैतिकता तरी कुठे शिल्लक ठेवली आहे. असा प्रश्न देखील विजय वडट्टीवार यांनी उपस्थित केलाय.


इतर महत्वाच्या बातम्या