रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यानंतर लसींचा तुटवडा ही बाब सर्वज्ञात आहे. पण, सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. अनेकांच्या पदरी निराशा देखील येत आहे. केव्हा ऑनलाईन नोंदणी न होणं तर केव्हा लस संपणं अशी एक ना अनके कारणं सध्या समोर येत आहे. काही ठिकाणी वादावादी, लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी नागरिकांचे खटके देखील उडत आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र लसीकरणासाठी झालेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायाला मिळालं. 


इथं झालेली गर्दी आणि गोंधळ पाहता अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी थेट पोलिसांनाच जाब विचारला. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मिस्त्री हायस्कूल या ठिकाणी घडलेला हा प्रसंग. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना राज्याच्या, देशातील परिस्थितीप्रमाणेच अनुभव येत आहे. अनेकवेळा पदरी निराशा पडत असल्यानं अनेकांच्या संयमाचा बांध देखील तुटत आहे. परिणामी त्याचीच प्रचिती रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मिस्त्री हायस्कूल या ठिकाणी पाहायाला मिळाली. यावेळी केंद्रावर कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसकरता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी काहीसा आक्रमकपणा घेतल्यानं साऱ्या प्रकारामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे.


काय घडलं? 
जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची म्हणावी अशी प्रगती दिसत नाही. दरम्यान, कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतिक्षा होती. 40 दिवस उलटल्यानंतर देखील यावेळी दुसरा डोस मिळाला नव्हता. जवळपास 40 दिवसानंतर जिल्ह्याला कोवॅक्सिनचे 200 डोस प्राप्त झाले. त्यामुळे मिस्त्री हायस्कूल या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेपासून रांग लावली. दुपारनंतर मात्र गर्दी वाढत गेली. त्यामुळे त्याठिकाणाहून काही जणांना बाहेर काढलं गेलं. गर्दी आणि कोरोनाचा संभाव्य धोका हा त्यामागील उद्देश होता. पण, दुपारी तीन वाजल्यानंतर मात्र चित्र पूर्णता बदलून गेलं. गर्दीमध्ये वाढ झाली. सकाळी आणि दुपारनंतर आलेलं नागरिक एकत्र झाले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात परजिल्ह्यातील नागरिक देखील येत लस घेत आहेत. त्यामुळे स्थानिकांना लस मिळत नसल्यानं देखील जिल्हावासियांमध्ये संताप दिसून येत आहे. 


झीरो वेस्टेज मिशन
कोरोनाचं लसीकरण करत असताना काही प्रमाणात डोस वाया देखील जातात. यावर आता रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागानं मिशन झीरो वेस्टेज सुरू केलं आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे मिशन सुरू केलं आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रावर दहाजण हजर असल्यास लसीकरणाची व्हायल फोडली जाणार आहे. त्याप्रकारच्या सुचना जाखड यांनी दिल्या आहेत. यामुळे व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांचं लसीकरण होण्यास मदत होणार आहे. एकदा व्हायल फोडल्यानंतर ती चार तासामध्ये वापरणं बंधनकारक आहे. जिल्ह्यात लस वाया जाण्याचं प्रमाण साधारण 1.9 टक्क्याच्या दरम्यान आहे. एका व्यक्तिला लस देताना सिरिंजमध्ये 0.5 मिली लस भरली जाते. यावेळी एखाद थेंब वाया देखील जातो. ही बाब लक्षात घेता कोविशिल्ड लसीच्या व्हायलमध्ये दहा टक्के मात्रा अधिक ठेवण्यात आली आहे. पण, आता याच अतिरिक्त मात्रांचा वापर करत जास्तीच्या लसीकरणासोबतच रत्नागिरी जिल्हा परिषदेनं मिशन झीरो वेस्टेज हाती घेतलं आहे. त्यामुळे एका व्हायलमधून दहा नाही तर अकरा जणांचं लसीकरण करण्याचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचा मानस आहे.