मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 71 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 40 हजार 956 रुग्णांचे निदान झाले आहे. कालही राज्यात 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 87.67 टक्के झाला आहे. तर राज्यात आज 793 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.
मुबंईत 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहेत. आज मुबंईत 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6082 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 41 हजार 102 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 6 लाख 23 हजार 80 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर 170 वर गेला आहे.
नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर
नवी मुंबईत कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्यात दीड हजारपर्यंत पोहचलेली दिवसभरातील कोरोना रुग्णसंख्या आता थेट दीडशेच्या आत आली आहे. महानगर पालिका प्रशासनाने केलेले ट्रेसिंग, एपीएमसीवर लावलेले निर्बंध आणि लॉकडाऊन या सर्वांचा परिणामामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे. आज नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या गेल्या 10 दिवसांत कमी होऊन ती फक्त 132 वर आली आहे.
8-44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वापरणार : राजेश टोपे
राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. 45 वर्षांवरील वयोगटातील पाच लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.