पुणे: महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने राष्ट्रकुलचं मैदान गाजवलं. बीडचा पैलवान आणि वस्ताद काका पवार यांचा पठ्ठ्या राहुल आवारेने कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी तब्बल 15-7 अशा मोठ्या फरकाने राहुल जिंकला.


राहुलच्या कामगिरीने त्याचे वस्ताद काका पवार खूपच भारावून गेले.

गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनात राहुल आवारेच्या हाताला सोनं लागलं आणि दिवंगत रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदारांचं स्वप्न साकार झालं.
वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!

राहुल आवारेनं ५७ किलो गटाच्या पहिल्या दोन्ही कुस्त्यांवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यानं इंग्लंडचा जॉर्ज रॅम आणि ऑस्ट्रेलियाचा थॉमस सिचिनी यांना लिलया हरवलं.  मग राहुलनं पाकिस्तानच्या मुहम्मद बिलालला १२-८ असं नमवून अंतिम फेरीत धडक मारली.

निर्णायक कुस्तीत राहुल आवारेचा मुकाबला होता कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीशी. तोही तितकाच ताकदीचा पैलवान होता. पण राहुलनं
ताकाहाशीचा कडवा संघर्ष १५-७ असा आठ गुणांनी मोडून काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

वस्ताद भारावले

राहुलच्या या विजयानंतर त्याच्या कात्रजमधल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील त्याचे प्रशिक्षक/वस्ताद काका पवार खूपच भारावून गेले. राहुलची मेहनत कामी आली. पोराने मरणाची, रात्रं दिवस तयारी केली होती, त्याचा आम्हाला खूपच अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया काका पवार यांनी दिली.

काय म्हणाले काका पवार?

"बारा वर्षांच्या मेहनतीने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळालं. हा माझा पठ्ठ्या आहे. त्याच्यावर अनेकवेळा अन्याय झाला, मात्र त्या अन्यायावर मात करण्यासाठी देवाने त्याला साथ दिली. तो बारा वर्षे सतत कुस्ती खेळतोय. आज त्याने आमची मेहनत सार्थ केली.

राहुल आवारे हरिश्चंद्र बिराजदारांकडेही होता, माझ्याकडेही होता. माझ्याकडे आल्यानंतर त्याने बरीच मेहनत घेतली. माझं आणि माझ्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र अजून एक स्वप्न पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मला त्याच्याकडून मेडल हवं आहे.

राहुल खूपच शांत आणि मेहनती आहे. ऑलिम्पिकमध्ये त्याच्यावर अन्याय झाला होता, मात्र त्यावर त्याने मात केली. आता त्याला सांगितलंय 2020 ऑलिम्पिक खेळायचं आहे आणि मेडल मिळवायचं आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी राहुलने खूप मेहनत घेतली होती. खूप मरणाची, रात्रं-दिवस तयारी केली होती. त्याची मेहनत फळाला आली. मला त्याचा अभिमान आहे".



संबंधित बातम्या 

वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!


सलग 3 कुस्त्या खेळून दमली, तरीही लढली, बबिताकुमारी रौप्यपदक जिंकली ! 


CWG 2018 : बीडचा पैलवान राहुल आवारेला सुवर्णपदक 


वायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!