मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीनं तपास अधिकारी बदलावा यासाठी कुटुंबीयांच्यावतीनं हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र तसं करणं हे याचिकाकर्त्यांवरच उलटू नये या शब्दांत खंडपीठानं त्यांना गर्भीत इशारा दिला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी तिरूपती काकडे हे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणारे दुसरे अधिकारी आहेत. याआधीच्या तपास अधिका-यांना बढती मिळल्यांन त्यांची बदली करण्यात आली. वारंवार संधी देऊनही याप्रकरणात तपासयंत्रणेला  यश मिळवण्यात अपयश आल्याचा आरोप करत पानसरे कुटुंबियांनी हा अर्ज केल्याचं समजतंय. एसआयटीतर्फे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा या मागणीला विरोधच राहील. त्यामुळे 19 डिसेंबरच्या पुढील सुनावणीत वरीष्ठ अधिका-यांशी चर्चा करून ते यावर आपलं प्रतिज्ञापत्र सादर करतील.


तर डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी वापरलेलं हत्यार खाडीपात्रातून शोधण्यासाठी सीबीआयनं आणखीन 45 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. मध्यंतरीच्या काळातील पाऊस, चक्रीवादळाबाबत धोक्याची सुचना यामुळे तपासकार्यात अनेक अडथळे आले. दाभोलकर यांच्या हत्येकरीता वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचे अवशेष आरोपींनी कळव्याच्या खाडीत टाकल्याची माहिती आहे. हे पिस्तुल शोधण्यासाठी नॉर्वेसह युरोपातील प्रशिक्षित डायव्हर्सची मदत घेतली जात आहे. मात्र ख्रिसमससाठी 15 डिसेंबर ते  5 जानेवारीपर्यंत ही मंडळी आपल्या मायदेशी परतणार आहेत. त्यामुळे सीबीआयनं मागितलेली ही मुदतवाढ हायकोर्टानं स्वीकारली आहे. तसेच पुणे सत्र न्यायालयात आरोपींविरोधात नव्यानं दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राबाबत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं चिंता व्यक्त केली. तपास महत्त्वपूर्ण वळणावर असताना पुराव्यांबाबत माहिती जाहीर होणं सरकारी पक्षासाठी चांगलं नाही, असं हायकोर्टानं सांगितलं.


कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट 2013 साली खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर - पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.