मुंबई : "सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट आहे. फक्त शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात शरद पवारांची भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे," असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावाही त्यांनी केला. बच्चू कडू एबीपी माझाशी बोलत होते.


शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे.

पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट
बच्चू कडू म्हणाले की, "सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. फक्त बऱ्याच लोकांच्या डोक्यांवर शरद पवारांची भीती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्याही डोक्यात भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे." सत्ता कशी स्थापन करणार हे शिवसेना-भाजपला विचारा असं वक्तव्य करुन शरद पवारांनी यांनी गुगली टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भाजपकडून आमंत्रण आलं होतं
राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला. पण मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता, त्यामुळे त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. मातोश्रीवर, मंदिरात शब्द दिला आहे, त्यामुळे खाली पडू देणार नाही," असंही ते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी नव्हती
सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुरुवातीला हेच गृहीत धरलं होतं की, शिवसेना-भाजपची सत्ता येईल. त्यादृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदललं, त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला. हे राजकारण आहे, इथे काहीही होऊ शकते. सुरुवातीला मानसिकता नव्हती. पण जे काही होत आहे, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत असेल हाच विचार करुन पुढे जायचं."

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. याविषयी विचारलं असता बच्चू कडू यांनी सांगितलं की, "कोण मुख्यमंत्री होणार, यापेक्षा कोणासाठी मुख्यमंत्री होणार हे पाहायचं आहे. कोणता पक्ष पाहून प्रहार होणार नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने होणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल."