Ajit Pawar Letter To CM Shinde: मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुर्दशेवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र लिहित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था (Potholes) झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर (Mumbai Nashik High way) तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा कालावधी लागत आहे. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बजवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीतून या महामार्गाला मुक्त करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित केली आहे. 


रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले


अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, मुंबई-नाशिक महामार्ग हा राज्यातला महत्वाचा मार्ग आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यापासून या महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. 


महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे प्रदूषणात भर


अजित पवारांनी म्हटलं आहे की, रस्त्यांवरील खड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरातील साकेत ब्रीजच्या रखडलेल्या कामामुळे तर या वाहतुक कोंडीत आणखी भर पडत आहे. या महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असं पवारांनी म्हटलं आहे.  


वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे


या महामार्गावरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे. या महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याबाबत संबधितांना सूचना द्याव्यात. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


रस्त्याच्या दुरवस्थेमुळे Mumbai-Nashik Expressway LTD कंपनीला तब्बल 1 कोटी 8 लाखांचा दंड ठोठावला


Prajakt Deshmukh : नाशिक-मुंबई महामार्ग नसून छळमार्ग, 'वाट दिसु दे गा'; असं म्हणत लेखक प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केला संताप