Sugar production : चांगल्या पावसामुळं तसेच पाण्याचा चांगला साठा उपलब्ध असल्यानं यंदा देखील राज्यात ऊस लागवडीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं यंदा देखील राज्यात साखरेचं  विक्रमी उत्पादन (Sugar production) होण्याचा अंदाज आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामात 203 सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी (19 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. यामध्ये ही माहिती देण्यात आली.


राज्यात ऊस लागवडीखालील क्षेतर 14 लाख 87 हजार हेक्टर 


यंदा राज्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा आला असून, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप केले होते. यातून शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी (FRP) अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड क्षेत्र सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर आहे. राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केलं असून, उत्तर प्रदेशला मागे टाकलं आहे.


यंदा देशातून 100 लाख मेट्रीक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज


यावर्षीचा ऊस गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित आहे. यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी 10.25 टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन 3 हजार 50 रुपयांची एफआरपी देण्यात येणार आहे. देशात सध्या 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात 30 लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून 100 लाख मेट्रीक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातील महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रीक टन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, इथेनॉल निर्मिती मध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के आहे. पुढील वर्षी 325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान, भारतातील सर्वोच्च साखर उत्पादक राज्य महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी पातळी गाठणार आहे. कारण ऊस पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळं साखरेच्या उत्पादनातही मोठी वाढ होमार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: