Ashadhi Wari 2023: यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते, त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिले आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2023) चोख नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी मोठी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 


पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन घेता यावं, यासाठी विशेष सुविधा करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक घेतली होती, त्यावेळी त्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.


पंढरीच्या वारीसाठी भरघोस निधी


पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून 10 कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता 25 वरून 50 लाख रुपयांची अशी दुप्पट निधीची तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे, त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले. 


वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी  दुप्पट केला आहे, तो तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत, यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 


मुख्यमंत्र्यांचे नेमके निर्देश काय?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


पंढरपूर विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी सावलीसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे लावले जातील, याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. वैद्यकीय पथकं, त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवण्याचे निर्देश त्यांनी केले. औषधं, पिण्याचं पाणी, अन्य आरोग्य सुविधा यांबाबत वेळीच नियोजन करा, असंही ते म्हणाले.


पंढरपूर वारी मार्गावर टोलमाफी


रस्त्यांसाठी भरघोस निधी दिल्याने रस्त्यांवर चिखल आणि राडा-रोडी दिसू नये, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले. ते म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये, यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.


जी-20 चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार वारी


जी-20 चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपूरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे दर्शन घडवण्यासाठी उत्तम नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


यावर्षी वारीसाठी 60 टक्क्यांहून अधिकचे मनुष्यबळ, तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.


हेही वाचा:


MHADA : म्हाडाकडून मुंबईतील 15 इमारती अतिधोकादायक असल्याचं जाहीर, 545 भाडेकरुंना घरं सोडण्याचे निर्देश