मुंबई: म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा 15 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त  इमारतींमध्ये 424 निवासी आणि 121 अनिवासी असे एकूण 545 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे इमारत दुरूस्ती मंडळाने आवाहन केलं आहे. 


म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील  मुंबई शहर बेटावरील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये 15 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. 


म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या 15 अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे : 


1)   इमारत क्रमांक 4-4 ए,नवरोजी हिल रोड क्र. 1, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)  
2)   इमारत क्रमांक 74 निझाम स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)
3)  इमारत क्रमांक 42, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
4)  इमारत क्रमांक 61-61ए , मस्जिद स्ट्रीट 
5)  इमारत क्रमांक 212 जे पांजरपोळ लेन
6)इमारत क्रमांक 173-175-179 व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी 
7)इमारत क्रमांक 2-4-6 नानुभाई देसाई रोड, मुंबई
8)  इमारत क्रमांक 1-23  नानुभाई देसाई रोड, मुंबई 
9)  इमारत क्रमांक  351 ए, जे एस एस रोड मुंबई
10)इमारत क्रमांक 387-391 बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
11)  इमारत क्रमांक 17 नारायण निवास , निकटवाडी 
12) इमारत क्रमांक  31सी व 33ए ,आर रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग, गिरगावचौपाटी  (मागील वर्षीच्या यादीतील)  
13) इमारत क्रमांक 104-106 ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)   
14) इमारत क्रमांक 40 कामाठीपुरा 4 थी गल्ली 
15) अंतिम भूखंड क्र. 721 व 724 टीपीएस - 3 विभाग, इमारत क्रमांक 40 बी व 428, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)             


या अतिधोकदायक उपकरप्राप्त  इमारतींमध्ये 424 निवासी आणि 121 अनिवासी असे एकूण 545 रहिवासी राहत आहेत.  मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार 155 रहिवाशांनी स्वतःची निवार्‍याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत 21 रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच 222 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. या करिता मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.    


रहिवाशांनी सहकार्य करावं, म्हाडाचं आवाहन     


अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशाना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या आणि आपल्या पारिजनांच्या  सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित तसेच वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.  


ही बातमी वाचा: