Bhiwandi News: भरधाव रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने रिक्षा महार्गावरील लोखंडी खांबाला धडक देऊन रिक्षा महार्गावरील 20 फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्यात पडून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबई नाशिक महार्गावरील पिपंळघर गावच्या हद्दीत असलेल्या भूमी वर्ल्ड समोर घडली आहे. या भीषण अपघात रिक्षांमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुन्नी देवी चव्हाण ( वय 32) , राधा चव्हाण ( वय 33), मुलगी अंशिका चव्हाण (वय दोन) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर रिक्षा चालक टॉनी उर्फ राकेश चव्हाण (वय 34), रवी चव्हाण (वय 11), अंजली चव्हाण ( वय 9), अंकिता चव्हाण ( वय 7) असे गंभीर जखमींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त चव्हाण कुटुंब टिटवाळा नजीक बनेली गावात राहतात. जखमी राकेश चव्हाण याची मृत मेहुणी उत्तर प्रदेशहून टिटवाळा येथे मृतक बहिणीच्या घरी पाच ते सहा दिवसांकरिता पाहुणी म्हणून राहण्यासाठी आली होती. त्यातच मेहुणीला मुंबई दर्शन घडवण्यासाठी रिक्षा चालक राकेश हा तिच्यासह मृत पत्नी व आपल्या चार मुलांना घेऊन रिक्षाने मुंबईतील जुहू-चौपाटीवर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गेला होता.
राकेश हा सर्वांना घेऊन रिक्षाने रात्री 9 वाजता उशिरा घरी परतत असताना बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीतील भूमी वर्ल्ड येथे त्यांची भरधाव रिक्षा आली असता, अचानक रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला खांबाला ठोकर धडक दिली. त्यामुळे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा मार्गात असलेल्या पाण्याने भरलेल्या 20 फूट खोल खड्यात पडली. यामध्ये रिक्षा पाण्यात बुडाली. अपघातानंतर राकेशने खड्ड्यातून डोके वर काढून ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल एक तासानंतर त्याची हाक ऐकून जवळ असलेला भंगारवाला आणि हॉटेलमध्ये काम करणारे तेथे पोहोचले. त्यापैकी एकाने पाण्यात उडी घेतली. मात्र तो देखील गंभीर जखमी झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी दोरी टाकून चव्हाण कुटूंबाला बाहेर काढले.
सर्वांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी राकेशची पत्नी मुन्नीदेवी , मेहुणी राधा आणि छोटी मुलगी आंशिका अशा तिघांना मृत घोषित केले. तर या अपघातात जखमी झालेले राकेश चव्हाण उर्फ टोनी, मुलगा रवी, मुलगी अंकिता व अंजली या जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेले तीनजण देखील बचावकार्य करताना जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा येथील त्याचे नातेवाईक आणि रिक्षाचालक युनियनचे मित्र मोठ्या संख्येने इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचले होते.
एमएमआरडीएच्या कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला?
दरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावर एमएमआरडीए मार्फत महामार्ग विस्ताराचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर भिवंडी हद्दीतील भूमी वर्ल्ड जवळ असलेला जुना नाला खोदून तेथे नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. मात्र एमएमआरडीएच्या रस्ता ठेकेदाराने या नाल्याच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तर सेफ्टी बेरिकेटर अथवा पत्रे लावून रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना नाल्याचे काम सुरु असल्याचा धोका समजण्यासाठी लाल रंगाचे सिग्नल दिवे लावलेले नव्हते. शिवाय मुंबई-नाशिक महामार्गावर देखील पथदिवे लावलेले नाहीत. या ठिकाणी पत्रे लावले असते तर किमान पाण्याने भरलेल्या खड्यात रिक्षा कोसळली नसती, अशी प्रतिक्रिया मृतकच्या कुटुंबासह रिक्षा चालकांमधून उमटली आहे.