मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आणि मंत्र्यांची देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडू शकेल अशी एक बाब समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची प्रत्येक आठवड्याला देवगिरी निवासस्थानी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेत असतात. बुधवारी रात्री उशिरा अशीच एक बैठक आमदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी पार पडली आणि याच बैठकीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याची बाब समोर आली.


मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटलांच्या खात्याच्या निर्णयांना स्थगिती


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर वैद्यकिय शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांनी खात्याचा पदभार घेतल्यानंतर काहीं खात्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले होते या निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती आहे.


मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी होती


मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारे थेट स्थगिती देण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची महिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महायुती म्हणुन काम पाहत असताना महायुतीतील एका घटक पक्षाचा प्रमुख म्हणून किमान माझ्याशी तरी स्थगिती देण्यापूर्वी चर्चा करणं गरजेचं होतं असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. 


आगामी काळात वादाची ठिणगी पडणार? 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीत झालेली कुरबुरीची घटना आता मध्यामांपासून लपून राहिलेली नाही. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतरची ही पहिलीच वेळ असेल जिथं थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकिकडे मंत्र्यांच्या खात्यांचे पीए, ओएसडी यांची नेमणूक देखिल मुख्यमंत्री कार्यालयाकडून ठरवण्यात येणार असल्याची बाब चर्चेत आहे दूसरीकडे थेट मंत्र्यांच्या कामात मुख्यमंत्र्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आगामी काळात महायुतीत आणखी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ही बातमी वाचा: