बुलढाणा : आपण सगळे जण मातीवर प्रेम करतो. मातीतून आपल्याला अन्न मिळतं. मातीपासून आपण घर तयार करतो. मातीपासून मूर्ती तयार करतो. पण मातीतून नशाही येते असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे. अलीकडे काही महिला, लहान मुलांना व वृद्धांना माती खाण्याचं व्यसन लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही नागरिक या मातीचं व्यसन करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. बुलढाण्यात या मातीची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. आर्श्चर्य म्हणजे ही माती चक्क दुकाणात मिळत आहे.   


तुम्हाला प्रश्न पडला असेल की माती आणि तीही दुकानातून विकत? हो! ही विशिष्ठ प्रकारची माती आहे, जी राजस्थानातून आणून बुलढाण्यात 1 रुपयाला 25 ग्रॅमच्या पाकिटात बंद करून विकली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे वृद्धांपासून ते लहान मुलं व महिलांनासुद्धा ही माती सेवन करण्याची सवय लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही किराणा दुकानात ही माती मिळते. विशेष म्हणजे ही माती खाण्याचे व्यसन ठरावीक एका वर्गाला नसून अगदी लहाणांपासून वृद्धांपर्यंत आहे.    


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील 55 वर्षीय बायनाबाई सावतकर या दहा वर्षांपूर्वी एका डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी शरीरात कॅल्शियम कमी झालं असल्याचं सांगितलं. सावतकर यांनी काही दिवस डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या देखील घेतल्या पण शेजारील एका महिलेने त्यांना ही माती खाण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून त्यांनी ही माला माती खाण्यस सुरुवात केली. सावतकर या रोज आठ ते दहा मातीच्या पुड्या किराणा दुकानावरून विकत आणतात आणि दिवसभरात खात असतात. त्यांच्या मते त्यांना यामुळे आता कुठलाही त्रास होत नाही व त्या शेतीची कामे नियमित करतात. अशा अनेक महिला, लहान मुलं, वृद्ध या भागात बघायला मिळतात.


या मातीत असा कोणता घटक आहे जेणेकरून ही माती खाण्याची सवय या महिला, लहान मुलं आणि वृद्धांना लागलीय? हे पाण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी सखोल माती परीक्षण करून त्याचा अहवाल तयार केला. त्यामध्ये मातीत कॅल्शियमचं प्रमाण धक्कादायक निघालं. या मातीत कॅल्शियमचं प्रमाण 21.25 टक्के असल्याचं तर इतर घटक अत्यल्प प्रमाणात असल्याचं समोर आलं. आम्ही केलेल्या परीक्षणानुसार या मातीत चुनखडीचे प्रमाण खूप जास्त आहे. चुनखडी ही व्यसनाधिष्ठ असते. परंतु, या मातीत असा कुठलाही रासायनिक घटक आढळला नाही, ज्यामुळे व्यसन लागू शकेल, अशी माहिती कृषी महाविद्यालयातील माती परीक्षण केंद्राच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. 
 
 ही माती सेवनामुळे अनेक पोटाचे, मानसिक आजार उद्भवतात. अशी माती सेवन करणारे अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येत असल्याचे तज्ञांनी सांगितले. शहरी भागातही अनेक लहान मुलं, महिला, गरोदर महिला व पुरुषही विशिष्ठ प्रकारची माती खात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. कुठल्याही किराणा दुकानावर ही विशिष्ट प्रकारची माती जिला "माला माती" किंवा "मुलतानी माती" अस म्हटलं जातं ती मिळते. अलीकडं या मातीचं सेवन कारणाऱ्यांची संख्या वाढली आहे.  
 
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारची माती खाण्यावर कुठलंही नियंत्रण नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागात याचं व्यसन नागरिकांना जडत आहे. यामुळे शरीराला हानी होऊ शकते. अशा प्रकारच्या मातीच्या सेवनाने शरीराला कॅल्शियमचा ओव्हरडोज होऊ शकतो व हे घातक होऊ शकत. 
 
वैद्यकीय दृष्ट्या माती अधिक व दीर्घकाळ सेवनाचे दुष्परिणाम 
या मातीमध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक म्हणजे 21.25 टक्के आहे. सामान्यतः मानवी शरीरात कॅल्शियमचं प्रमाण 8.5 ते 10.2 मायक्रो ग्रॅम / पार्ट असते. ही माती प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने व दीर्घकाळ सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. अर्थात सेवन करणाऱ्याच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊन किडनीची कार्यक्षमता कमी होते. शिवाय तहान खूप लागते व परत परत लघवीला जावं लागतं. तसेच भुकेवर परिणाम होऊन पचनसंस्था बिघडते. अधिक कॅल्शियममुळे शरीरातील हाडे नाजूक होतात. कॅल्शियमचं प्रमाण वाढल्याने मेंदूवर परिणाम होऊन अनेकदा चक्कर येणे, थकवा जाणवणे, डिप्रेशन येणे तर हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन हृदयगती कमी जास्त होणे, हृदय गतीवरील नियंत्रण सुटणे असे धोकादायक प्रकार होऊ शकतात. एकंदरीतच कॅल्शियम अतिप्रमाणात सेवन करणे शरीराला हानिकारक ठरू शकतं. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या:


पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?


Omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, सुरक्षेसाठी कशी घ्याल काळजी?