Omicron : मुंबई - कोरोनासारख्या (corona) महामारीचे संकट थोडेसे ओसरत असल्याचे वाटत असतानाच ओमायक्रॉनच्या (Omicron) नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाचीच झोप उडविली आहे. ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थरावरूनच सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक देशांनी आपापली नियमावली तयार केली आहे. भारतानेही राज्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यांनीही तयारी करायला सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन हा व्हेरियंट महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. कर्नाटत (karnataka) ओमायक्रॉन या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळलेत. त्यामुळे महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता कोविड टास्क फोर्सची कशी तयारी सुरु आहे. त्याचं नियोजन काय आहे? याविषयी जाणून घेण्यासाठी कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी एबीपी माझासोबत संवाद साधलाय.
याबाबत माहिती देताना डॉ. शशांक जोशी सांगतात, ओमायक्रॉन हा अत्यंत झपाट्याने पसरणारा व्हायरस आहे. भारतात हा व्हायरस जास्त पसरू नये यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियमावली करण्यात आली असून विमानतळांवर कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रताही दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. शिवाय चाचणी निगेटिव्ह आली तरी सात दिवस वीलगीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांना लसीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
कोरोनाची तीसरी लाट आली तरी त्याला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे तयार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. तरीही नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जबाबदारीने वागावे. राज्याने घालून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे. शिवाय कोरोनाची लक्षणे दिसताच तत्काळ चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले आहे.
कशी घ्याल काळजी?
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, एसीचा जास्त वापर करू नका, पंखे चालू ठेवू नका, शक्यतो डबल मास्कचा वापर करा अशी माहिती डॉ. शशांक जोशी यांनी सांगितली आहे.
घाबरण्याची गरज नाही
ओमायक्रॉन हा झपाट्याने पसरणारा व्हायरस असला तरी त्याला जास्त घाबरण्याची गरज नाही. फक्त योग्य ती खबरदारी घेऊन त्यापासून कसे वाचता येईल याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतर्क करा. आजार अंगावर काढू नका, असे डॉ. जोशी सांगतात.
Omicron : ओमायक्रॉन वेशीवर, काय काळजी घ्याल? COVID Task Forceचे Dr Shashank Joshi 'माझा'वर, पाहा व्हिडिओ
संबंधित बातम्या